Friday, April 26, 2024
Homeनगर20 लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद

20 लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी) – नागापूर येथील युवकालो 20 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी कट्ट्यासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बाबत माहिती अशी की, अक्षय जायभाय याला सोन्या सोनवणे या नावाने फोन करून तुला लग्नपत्रिका द्यायची आहे, असे सांगून निंबळक रोडवरील रणजित पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बोलावले. यावेळी जायभाय संबंधित ठिकाणी गेला असता तेथे काटवनात कारजवळ थांबलेल्या पाच अनोळखी व्यक्तींनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यास सावेडी येथे नेऊन फिर्यादीची आई व ओळखीचे राजू मुंगसे यांना फोन करून 20 लाख रुपये घेऊन या, तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास तुमच्या मुलास जीवे मारू अशी धमकी दिली.

- Advertisement -

याबाबत अक्षय याच्या आईने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना ही माहिती दिली. याबाबत पवार यांनी आरोपींच्या शोधासाठी तात्काळ पथके रवाना केली. आपल्या मागावर पोलीस असल्याचे समजताच संबंधित आरोपींनी अक्षय यास पारनेर तालुक्यातील पानोली घाटात नेऊन त्याच्याकडील दोन हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. त्याला तेथेच सोडून सर्वजण पुण्याकडे निघून गेले.

त्यानंतर अक्षयने आपल्याला आरोपींनी पानोली घाटात सोडून दिल्याचे फोन करून सांगितले. त्यानुसार पथकातील कर्मचार्‍यांनी त्याला पानोली घाटातून ताब्यात घेतले. या बाबत त्याच्याकडे अधिक चौकशी करून राजू मुंगसे याच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यांनी फोन केल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने आपणच हा गुन्हा वाघोली येथील ओंकार गुंजाळ याच्यासह इतर साथीदारांकडून केल्याची कबुली दिली.

याबाबत प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख, बाळासाहेब मुळीक, सोन्याबापू नानेकर, दीपक शिंदे, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, सुदीप पवार, राहुल सोळुंके, सागर सुलाने, रोहित मिसाळ, सागर ससाणे, मयूर गायकवाड, दिगंबर कारखिले, चालक संभाजी कोतकर यांच्या पथकाने ओंंकार शंकर गुंजाळ (वय-22), अमन दस्तगीर पटेल (वय-20), ईशाप्पा जगन्नाथ पंदी (वय-20) (सर्व रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे) यांच्यासह एक अल्पवयीन मुलास अटक केली. गणेश बाबा चव्हाण (रा. केसनंद ता. हवेली जि. पुणे) हा पसार झाला आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, छर्‍याचे पिस्टल, 6 ग्रॅम सोन्याची अंगठी, 1 लाख रुपये रोख रक्कम, वेगवेगळ्या कंपन्यांचे सात मोबाईल असा एकूण एक लाख 43 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या