Thursday, April 25, 2024
Homeनगरदाते, कराळे समर्थकांमध्ये अर्ज भरण्यावरून धूसफूस

दाते, कराळे समर्थकांमध्ये अर्ज भरण्यावरून धूसफूस

अहमदनगर (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत आली होती. सत्तेत आल्यानंतर पक्षाचे सदस्य संदेश कार्ले, गटनेते अऩिल कराळे यापैकी एकाला सभापतिपदावर संधी मिळेल, अशी अपेक्षा नगर आणि पाथर्डी तालुक्यातील शिवसैनिकांची होती. मात्र, ऐनवेळी सभापतिपदावर पारनेरचे काशिनाथ दाते यांना संधी मिळाल्याने निष्ठावान शिवसैनिकांवर पक्षाकडून अन्याय झाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना कराळे आणि दाते समर्थकांमध्ये धुसफूस झाली. यावेळी सभापती क्रमांक एकच्या अर्जावर दोघांच्या समर्थकांकडून आपआपल्या नेत्यांचे नाव क्रमांक एकवर टाकण्याचा आग्रह धरण्यात आला. यावेळी अर्जाची हिसका हिसकी देखील झाली.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला ताकद देण्यासाठी पक्षाच्या सदस्याला जिल्हा परिषदेत दमदार खाते मिळावे, अशी शिवसेनेच्या सदस्यांची मागणी होती. यासाठी दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह शिवसेनेचे सदस्य श्रेष्ठींच्या संपर्कात होते. दोन दिवसांपूर्वी या सर्वांनी मुंबईवारी करून जिल्ह्यातील स्थिती समजावून सांगितली होती. त्यानुसार पक्षाकडून दोन विषय समित्यांचा आग्रह धरण्यात आला.

मात्र, निवडीच्या दिवशी पक्षाच्या नेत्यांनी एका विषय समितीच्या सभापतिपदावर समाधान मानले. त्यातच शिवसेनेच्या बांधकाम समितीच्या सभापतिपदाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांचा विरोध होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सदस्य हे कोणत्याही परिस्थितीत ही समिती शिवसेनेला मिळू नये, यासाठी प्रयत्नशील होते. त्याऐवजी ही समिती क्रांतिकारी शेतकरी पक्षाला देण्यास राष्ट्रवादीचे सदस्य तयार झाले होते. यामुळे गुंता वाढला होता. यातूनच ऐनवेळी शिवसेनेच्या एका सभापतिपदाला फुली मारण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

काँग्रेसकडून महिला व बालकल्याण समितीसाठी श्रीरामपूरमधील काँग्रेसच्या सदस्य आशा दिघे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडून मीरा शेटे यांना संधी देण्याचा निर्णय झाला. यापूर्वी 2007 ला कार्ले यांना उपाध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. ऐन वेळी त्यांचे पद हुकले, तर त्यानंतर यंदा त्यांच्या पदरी पद पडेल, अशी शक्यता होती. हीच परिस्थिती कराळे यांच्याबाबतीत झाली. त्यांची संधी यंदा हुकली आहे.

मी पुन्हा आलो
जिल्हा परिषदेत गत अडीच वर्षात सर्वांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी सर्वांना विश्वासात घेऊन काम केले आणि त्याची दखल पक्षाने घेत मला पुन्हा समाजकल्याण समितीत सभापतिपदावर काम करण्याची संधी दिली, असे सांगत ‘मी पुन्हा आलो’ असल्याची भावना नूतन सभापती उमेश परहर यांनी व्यक्त केली.

महिलांना न्याय मिळवून देणार
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे मला महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदावर काम करण्याची संधी मिळाली. मला राजकीय कामाचा अनुभव कमी असला, तरी सभापतिपदाच्या माध्यमातून समाजातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे सभापती मीरा शेटे यांनी सांगितले.

सामान्यांसाठी काम करणार
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत सभापतिपदाच्या माध्यमातून काम करणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झालेली आहे. जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांसाठी काम करणार असल्याचे नूतन सभापती सुनील गडाख यांनी स्पष्ट केले.

आजी-माजी अध्यक्षांकडून तिळगूळ वाटप
जिल्हा परिषदेत विषय समितीच्या सभापतिपदाच्या निवडी अगोदर माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी तिळगूळ वाटप केले. यावेळी त्यांच्या मदतीला विद्यमान अध्यक्षा राजश्रीताई घुले आणि माजी सभापती अनुराधा नागवडे या देखील आल्या. अध्यक्ष विखे यांनी सर्व सदस्य आणि अधिकार्‍यांना तिळगूळ वाटप करत मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.

भाजप सदस्यांच्या बैठका विळद घाटात
भाजप सदस्यांची बैठक विळद घाटात विखे फाउंडेशनमध्ये झाली. त्याठिकाणी महाविकास आघाडीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत होते. त्यांच्याकडून शिवसेनेला मदत करण्याची तयारी होती. सत्तेचे समिकरण जुळणार नसल्याचे लक्षात आल्यावर भाजपच्या सदस्यांनी निवडणुकीतून माघारी घेतली आणि निवडी बिनविरोध झाल्या.

राजकीय गॉडफादर नसल्याने ऐनवेळी जिल्हा परिषदेत पदावर जाण्याची संधी हातून निसटली. मात्र, मी सर्वसामान्यांसाठी काम करत असून यापुढेही करत राहील. विस्थापित असल्याने माझा प्रस्थापितांपुढे निभाव लागला नसल्याची खंत शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या