दलित वस्त्यांच्या कामांसाठी 112 कोटींचा निधी

jalgaon-digital
3 Min Read

जिल्हा परिषद : 95 कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांतील दलित वस्त्यांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार कामे सुरू असून यंदाच्या वर्षी 2019-20 साठी या वस्त्यांमध्ये 112 कोटींची विकासकामे करण्यात येणार असून, 95 कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात 4 हजार 296 दलित वस्त्या आहेत. 10 ते 25 लोकसंख्या असलेल्या 2 लाख, 26 ते 50 लोकसंख्येसाठी 5 लाख, 51 ते 100 लोकसंख्येसाठी 8 लाख, 101 ते 150 लोकसंख्येसाठी 12 लाख, 151 ते 300 लोकसंख्येसाठी 15 लाख तर 300 च्या पुढे लोकसंख्या असलेल्या वस्तीसाठी 20 लाखांपर्यंतच्या निधीतून विकासकामे करण्यात येतात. यंदाचा आराखडा हा 89 कोटींचा आराखडा असून, जिल्हा परिषद मात्र दीडपट कामांना मंजुरी देणार असल्याने हा आराखडा यंदा 112 कोटींचा होणार आहे. त्यानुसारच दलित वस्त्यांमध्ये विकास कामे करण्यात येत आहेत.

गेल्यावर्षी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी दलित वस्त्यांचा बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्या घोषित करण्याचा ठराव मासिक बैठकीत घ्यावा लागतो. अशा वस्त्यांचा आराखडा ग्रामपंचायतींनी पंचायत समितीला सादर केला होता. पंचायत समित्यांनी हा आराखडा वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला.

त्या आराखड्यावर हरकती घेण्यात आल्या होत्या. हरकतींवर अंतिम निर्णय घेऊन आराखडा अंतिम करण्यात आला होता. पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी हा आराखडा जिल्हा समाजकल्याण अधिकार्‍यांकडे सादर केला. त्यानंतर हा आराखडा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेऊन मंजुरी घेण्यात आली. आराखडा तयार करताना शासन निर्णयातील नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यामुळे अंतिम झालेले आराखडे अचूक असल्याचे समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे यांनी सांगितले.

यावर्षी करावयाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेने प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार प्राप्त प्रस्तावांना मंजुरी देऊन अनेक कामांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले. सद्यस्थितीत 2 हजार 273 कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सर्वाधिक कामे ही राहाता व नेवासा तालुक्यात करण्यात येणार आहेत. हा निधी खर्च करण्यासाठी मार्च 2021 ची अखेरची मुदत आहे.

तालुकानिहाय मंजूर कामे व निधी
अकोले 91 (3 कोटी 36 लाख), संगमनेर 229 (9 कोटी 48 लाख), कोपरगाव 161 (7 कोटी 27 लाख) राहाता 232 (11 कोटी 16 लाख), श्रीरामपूर 58 (1 कोटी 72 लाख), राहुरी 164 (6 कोटी 88 लाख), नेवासा 251 (10 कोटी 61 लाख), शेवगाव 163 (7 कोटी 45 लाख), पाथर्डी 156 (6 कोटी 74 लाख), जामखेड 79 (2 कोटी 96 लाख), कर्जत 213 (9 कोटी 6 लाख), श्रीगोंदा 168 (6 कोटी 25 लाख), पारनेर 164 (5 कोटी 60 लाख), नगर 144 (7 कोटी 5 लाख).

दलित वस्त्यांचा विकास आराखडा तयार करताना वस्तीची सध्याची लोकसंख्या विचारात घेतली आहे. कामांची गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा, वीज, गटारे, मलनि:स्सारण, अंतर्गत रस्ते, पाण्याचा निचरा, पथदिवे व समाजमंदिरे या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. लवकरात लवकर विकासकामांना सुरुवात करून प्राधान्याने कामे पूर्ण करत निधी अखर्चित न ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-उमेश परहर, सभापती, समाजकल्याण समिती

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *