Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अद्यापही अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित

Share

वांगी (वार्ताहर) – प्रत्येक वर्षी विमा हप्ता भरूनही श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी मात्र पीक विम्यापासून वंचित राहतो. पीक विम्याचे पैसे घेऊन विमा कंपन्या मात्र मालामाल होत आहेत; तर दुसरीकडे शेतकर्‍याची आर्थिक स्थिती खराब होत चालली आहे. त्यामुळे पीक विमा भरूनही शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे येईनात, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांकडून देण्यात आला आहे.

ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे होऊन चार महिने उलटून गेले, तरी अद्याप शेतकर्‍यांच्या खात्यावर विमा कंपन्यांकडून पैसे जमा होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. मागील अनेक वर्षापासून श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी विमा भरत असतानाही तालुक्याला सातत्याने डावलण्यात आले आहे.

गेल्या तीन-चार वर्षापासून सातत्याने दुष्काळाला तोंड देत असताना आर्थिक संकटाने ग्रासलेल्या बळीराजाने खरीप हंगाम 2019 मध्ये आर्थिक अडचण असतानासुध्दा उसनवारीने पैसे गोळा करून खरीप पिकाचा विमा उतरविला. मात्र, विमा कंपन्यांकडून अद्याप शेतकर्‍यांना विम्याचे पैसे देण्यासंदर्भात कुठेही हालचाली होताना दिसत नाहीत.

त्यामुळे शेतकर्‍यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला शेतकर्‍यांसाठी संरक्षक कवच म्हणून विमा कंपन्यांचा उल्लेख होतो, मात्र त्या शब्दाची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी होताना दिसत नाही. ही शेतकर्‍यांच्या दृष्टीने मोठी शोकांतिका असल्याचे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. ज्याप्रमाणे विमा भरून घेण्यासाठी शेतकर्‍यांना अंतिम तारीख दिलेली असते, अगदी त्याचप्रमाणे विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांचे पैसे देण्यासाठी सक्तीची अंतिम तारीख असायला हवी, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

एकंदरीतच पीक विमा भरून शेतकर्‍यांचे हाल तर विमा कंपन्या मालामाल होताना दिसत आहेत. शेतकर्‍यांना भोळा समजून त्याच्याकडून पैसा गोळा करून मागील धडे तर गिरवणार नाही ना? अशी शंका शेतकरी विचारत आहेत. संबंधित विभागाकडे चौकशी केली तर अधिकार्‍यांकडून कानावर हात ठेवले जातात. मग हा प्रश्न मांडयचा तरी कुणाकडे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

मागील काही दिवसांमध्ये शेतकर्‍यांना विमा मिळेल अशा घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र त्या घोषणा हवेतच विरल्या गेल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. आता तरी शेतकर्‍यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित त्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी वांगी, खिर्डी, गुजरवाडी, कारेगाव, भेर्डापूर आदींसह श्रीरामपूर तालुक्यातील गावांतील शेतकर्‍यांनी केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!