Thursday, April 25, 2024
Homeनगर‘पीक विमा’तून कार्पोरेट कल्याण

‘पीक विमा’तून कार्पोरेट कल्याण

राजू शेट्टी यांचा आरोप : भाजपवाले काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पुढचे निघाले

राहाता (तालुका प्रतिनिधी)- पंतप्रधान पीक विमा योजना शेतकर्‍यांऐवजी कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात म्हणून भाजपकडे गेलो तर ते यांच्याही पुढचे निघाले, असा टोला लगावत ‘त्यांच्यापेक्षा सध्याचे बरे’ असेही ते म्हणाले.

- Advertisement -

साकुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन माजी खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. यावेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोपळे, रवींद्र मोरे, विठ्ठलराव शेळके, प्रकाश देठे, जितेंद्र भोसले, सुरेश ताके आदी उपस्थित होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, विमा कंपन्या या महसूल व कृषी विभागातील प्रशासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून खोटे रिपोर्ट तयार करून शेतकर्‍यांना फसवतात. या पीक विमा कंपन्यांनी राज्यात मागील काही वर्षात हजारो कोटी रूपये कमावले. राज्यात मागील वर्षात अनेक आपत्ती आल्या. त्या पाहता पीक विमा कंपन्या कंगाल होतील, असा समज होता. मात्र झाले त्याच्या उलट. या आपत्तींच्या पोटी त्यांनी हजारो कोटी रूपये कमावले. खोटे उद्योग या कंपन्या करतात त्यामुळे शेतकर्‍यांना पैसाच मिळत नाही. पंतप्रधान पीक विमा योजना आहे की प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण योजना हेच कळत नाही, असग त्यांनी सांगीतले. या कंपन्या व प्रशासकीय अधिकारी शेतकर्‍यांची फसवणूक कशी करतात याची उदाहरणे त्यांनी दिली.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात म्हणून भाजपाकडे गेलो होतो. ते तर यांच्याही पुढचे निघाले. त्यामुळे भाजपाबरोबर राहणे योग्य वाटले नाही. त्यांच्या एजेंड्यावर शेतकरी नव्हता व नाही.म्हणून त्यांच्यापेक्षा सध्याचे महाविकास आघाडीवाले बरे असले तरी यांनीही शेतकर्‍यांचा भ्रमनिरास सुरू केला आहे.

साखरेचे भाव केंद्र सरकारने स्थिर केला हा योग्य निर्णय होता. तयार झालेले इथेनॉइल अपेक्षेनुसार उचलत नाही त्यामुळे साखर उद्योगाला व शेतकर्‍याला फायदा होताना दिसत नाही. आता ब्राझील मधून इथेनॉल आयातीसंदर्भात काही तेल कंपन्या चर्चा करत आहे. ब्राझिलच स्वस्त इथेनॉल देशात आल्यावर आपल घेतले जाईल का? त्यामुळे साखर उद्योग व उस उत्पादकाला न्याय कसा मिळेल? असा सवाल करून इथेनॉलचा भाव 60 रूपये असावा अशी मागणीही त्यांनी केली.

आज शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची पदाधिकारी निवड होणार असून सर्व समावेशक कार्यकर्त्यांची निवड केली जाईल, असे राजु शेट्टी यांनी यावेळी सांगीतले.

शेतकर्‍यांची व्होट बँक नाही
शेतकर्‍यांना न्याय मिळावा ही आमची भुमीका आहे. मात्र शेतकरी अजूनही संघटीत होत नसल्याने शेतकर्‍यांची एकत्रित व्होट बँक तयार होत नाही. आहे त्या परीस्थीतीत आम्ही राजकीय दबाव गट म्हणून काम करत आहोत. आत्तापर्यंत सर्वांनी आम्हाला वापरून घेतले. आता आम्ही प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा वापर करू.

सरपंच निर्णयावरून महाविकास आघाडीवर टीका
शेतकर्‍यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. हे सरकार घराणेशाहीचं समर्थन करणारे आहे, असा आरोप त्यांनी केला. थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करणे चुकीचं आहे. नवीन नेतृत्व तयारच होऊ द्यायचं नाही, ही राज्य सरकारमधील लोकांची मानसिकता आहे. आपलीच पारंपरिक घराणी सत्तेत राहिली पाहिजेत यासाठी हा निर्णय असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या