Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राहुरी तालुक्याच्या वावरथ जांभळी शिवारात कुख्यात गुन्हेगार बल्ली साळवे जेरबंद

Share
राहुरी तालुक्याच्या वावरथ जांभळी शिवारात कुख्यात गुन्हेगार बल्ली साळवे जेरबंद, Latest News Criminal Arrested Rahuri

राहुरी (प्रतिनिधी)-  खून, दरोडे महामार्गावरील जबरी चोरी अशा अनेक गुन्ह्यांत चौदा पंधरा वर्षांपासून पसार असलेला कुविख्यात गुन्हेगार बल्ली ऊर्फ बाबासाहेब भाऊसाहेब साळवे, रा. शिंगवे नाईक, ता. नगर यास जेरबंद करण्यात राहुरी पोलीस पथकाला यश आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी राहुरी पोलीस कार्यालयात पत्रकार परिषदेत या कामगिरीची माहिती दिली. औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांत त्याचा सहभाग होता. अनेक पोलीसपथके त्याचा शोध घेत होती.

बल्ली ऊर्फ बाबासाहेब भाऊसाहेब साळवे हा नगर तालुक्यातील शिंगवे नाईकचा राहणारा असला तरी तो तेथे घरी राहत नव्हता. राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी परिसरातील जंगल परिसरात तो राहत होता आणि वेषांतर करून अनेक गुन्हे त्याने केलेले आहेत. गुन्हेगारांच्या टोळ्या तो तयार करीत होता. म्हैसगाव गाव परिसरात शनिवारी रात्री तो येणार, अशी खबर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाल्यानंतर त्या परिसरात सापळा लावण्यात आला. रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकलवर भरधाव वेगात तो जात असल्याची खात्री पटताच राहुरीच्या पोलीस पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला.

या पथकात पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याबरोबर सोमनाथ जायभाय, प्रवीण खंडागळे, आदिनाथ पाखरे, सचिन ताजणे आदींचा समावेश होता. पाठलाग सुरू आहे, याचा सुगावा लागताच मोटारसायकल सोडून तो परिसरातील जंगलात सैरावैरा धावू लागला. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तो तेथे अडखळला. त्यावेळेस पोलिसांनी झडप घालून त्यास पकडले.

त्याच्याकडून धारदार चाकू जप्त केला. राहुरी, एमआयडीसी, पारनेर, लोणी, राहाता, कोपरगाव अशा अनेक ठिकाणी त्याच्यावर खून, दरोडा, महामार्गावरील लूट या स्वरूपाचे शंभर पेक्षाही अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीच्या पथकाने ही कामगिरी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!