Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नराधम बलात्कार्‍याला बाकाला बांधून ठार केले !

Share
अकोले : पीडितेच्या नातेवाईकांकडून अत्याचार करणार्‍याचा खून, Latest News Crime News Relatives Victim Murders Akole

अकोले तालुक्यातील घटना । तिघांना अटक

राजूर (वार्ताहर)- 55 वर्षीय महिलेवर अत्याचार करणार्‍या नराधम राजू गणपत सोनवणे (वय 45 रा.शिरपुजे) यास संतप्त तरुणांनी सिमेंटच्या बाकड्यास बांधून मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथे काल बुधवारी घडली. राज्य आणि देशभरात होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजाची मानसिकता दर्शविणारी ही घटना आहे. याप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागामधील शिरपुंजे येथील महिला आपली जनावरे चारण्यासाठी जायनेवाडी गावच्या शिवारातील खरंबा माळावर मंगळवारी सकाळी गेली होती. ती एकटीच असल्याने राजू गणपत सोनवणे याने संधी साधत दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास तिच्यावर बलात्कार केला व जंगलात पळून गेला. यासंदर्भात फिर्याद राजूर पोलिसांत 55 वर्षीय पीडित महिलेने दिल्याने राजूर पोलिसांनी आरोपी राजू गणपत सोनवणे (वय 45 रा.शिरपुंजे) यांच्या विरोधात भादंवि कलम 376 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

दरम्यान, खून प्रकरणी पोलीस पाटील रंगनाथ धिंदळे यांनी राजूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, अक्षय तपासे व संतोष तपासे यांनी मला मोबाईलवरून संपर्क केला. त्यावेळी त्यांनी एका महिलेवर राजू गणपत सोनवणे याने अत्याचार केल्याचे सांगितले. तसेच आम्ही राजू सोनवणेला धरून पोलीस स्टेशनला नेत असल्याचे कळविले. मी अकोलेहून राजूरला आलो. काही वेळाने अक्षय संजय तपासे, योगेश उर्फ अशोक उर्फ लालू तपासे, विजय सुधाकर तपासे, तुळसाबाई सुधाकर तपासे, दिलीप पांडुरंग साळवे, अरूण पांडुरंग साळवे, दादू तपासे ही मंडळी राजू सोनवणेला धरून घेऊन आले. तेव्हा राजूस मार लागलेला असल्याने पोलिसांनी त्यास दवाखान्यात नेण्यास सांगितले.

त्यावर अरूण साळवे व अन्य दोघे त्यास दवाखान्यात घेऊन गेले. त्यानंतर मी विजय तपासे आणि इतरांना काय झाले याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांच्याकडून समजले की, पीडित महिला दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास खारंबा माळावर जनावरे चारीत असताना राजू सोनवणे याने तेथे येऊन अत्याचार केला व जंगलात पळून गेला. ही गोष्ट गावातील तरूणांना कळल्यानंतर विजय तपासे, अक्षय तपासे, योगेश तपासे यांनी रागाच्या भरात जंगलात अत्याचार करणार्‍या राजू सोनवणेचा कसून शोध घेतला. तो सापडताच त्याला जबर मारहाण करीत शिरपुंजे गावात घेऊन आले.

गावात सिंमेटच्या बाकास त्याला बांधून ठेवले. त्यानंतर खासगी गाडी करून त्यास राजूरला नेण्यात आले. राजू गणपत सोनवणे यास मार लागलेला असल्याने उपचारासाठी राजूरच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. पण त्यास जादा मार लागल्याने तो अत्यवस्थ होता. त्यामुळे येथील डॉक्टरांनी नाशिकला हलविण्याचा सल्ला दिला. पण नाशिकला नेत असतानाच रस्त्यातच रूग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान घडली.

यावरून पोलिसांनी विजय सुधाकर तपासे, अक्षय संजय तपासे, योगेश उर्फ महेंद्र अशोक तपासे यांच्या विरोधात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा राजूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि.नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक नितिन खैरनार करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती कळताच श्रीरामपूर उपविभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन माहिती घेतली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!