Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी तरुणीस विवस्त्र करून मारहाण

Share
प्रशासनास अंधारात ठेऊन इराणी नागरिकाचे वास्तव्य, crime against hotel owner nagar

पेट्रोलही ओतले  || पतीलाही धोपटले || पोलिसाचा समावेश || अत्याचार करणारे जामिनावर

अहमदनगर (प्रतिनिधी) – अत्याचार प्रकरणातील फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे. तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू आणि नवर्‍यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे. यापूर्वीही महिलेला पोत्यात घालून रेल्वेखाली मारण्याचा प्रयत्न झाला होता.

नगरमध्ये 2016 मध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाला होता. त्याची फिर्याद दिल्यानंतर तोफखाना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आरोपींमध्ये वडील आणि भावासह पोलीसही सहभागी आहेत.

अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येत आहे. मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही आरोपींना जामीन नाकारले आहेत. चार वर्षे उलटूनही गंभीर गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झालेले नाही.

पीडित पती-पत्नी शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर आल्यावर एका रिक्षात बसले. रिक्षामध्ये एक माणूस आधीच बसलेला होता त्याने यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञातस्थळी नेले. त्याठिकाणी एका बंदिस्त रूममध्ये पती-पत्नीचे कपडे काढून विवस्त्र करून त्याच कपड्यांनी त्यांना टांगण्यात आले. पट्याने मारहाण करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले. फिर्याद मागे घ्या, अन्यथा मारून टाकू, अशी धमकी दिली गेली. मारायचा व्हिडिओ करून जर तुम्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तर तुमची व्हिडीओ क्लिप आम्ही व्हायरल करू अशी धमकी देण्यात आली. जर तुम्ही फिर्याद दिली तर तू याठिकाणी आला होता आणि तू दुसर्‍या महिला अत्याचार केला, अशी फिर्याद तुझ्यावर दाखल करेन, अशी धमकी देण्यात आली होती.

पती-पत्नीने आम्ही तुमच्या विरोधात फिर्याद दाखल करणार नाही असे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना नगरला आणून सोडले. मारहाण करताना आम्ही पोलीस आहोत असेही ही दोन आरोपी सांगत होते. न्यायालयात जाऊ नको असे सांगितले होते. तरीही तू गेला म्हणून तुझेही हाल केले. आता गेला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचा पीडितांचा आरोप आहे. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करून पीडितेला न्याय देणार आहे. या घटनेमध्ये पोलिसांचा सहभाग असेल तर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. पीडित पती-पत्नीच्या सुरक्षेची पोलिसांकडून पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रीया प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पिडीत पती-पत्नी यापूर्वी माझाकडे आले असते. तर, यापूर्वीच त्यांना न्याय दिला असता. मी या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे. याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे. अशी प्रतिक्रीया खा.डॉ.सुजय विखे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.

नगर जिल्ह्यात कोपर्डी सारखी घटना घडली. पारनेरातून आरोपींनी पलायन केल्याची घटना तसेच अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहेत. असे असतानाही दोन महिन्यांपासून पोलीस अधिक्षक नाही. या जिल्ह्यातील मंत्र्यांनी गंभीरतेने दखल घ्यावी. काही अनर्थ घडण्यापूर्वी या जिल्ह्याला लवकरात लवकर नवा पोलीस अधिक्षक मिळावा.
– सरूनाथ उंबरकर, माजी पं.स. सदस्य

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!