Friday, April 26, 2024
Homeनगरटरबुजांखाली लाखो रूपयांची सुगंधी तंबाखू

टरबुजांखाली लाखो रूपयांची सुगंधी तंबाखू

अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली टेम्पोमधून (क्र. एमएच- 04 डीके- 5268) टरबूजच्या खाली सुगंधी तंबाखूची वाहतूक करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगरमध्ये अटक केली आहे.

त्यांच्याकडून नऊ लाख 45 हजरांची तंबाखू, टेम्पो, टरबूज असा 15 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रमजान मन्सूर पठाण (वय- 28 रा. संजयनगर, नगर), आयाज इस्साक बागवान (वय- 39 रा. गाझीनगर, नगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांनी ही सुगंधी तंबाखू औरंगाबाद येथील जूबेर (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्याकडून आणल्याची कबूली दिली.

- Advertisement -

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेची वाहतूक व विक्री करण्यास परवानगी आहे. परंतु, काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. टेम्पोमध्ये टरबूजच्या खाली सुगंधी तंबाखूची वाहतूक करून नगरमधील काटवन खंडोबा परिसरात विक्रीसाठी आणली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.

त्यांनी पोलीस हवालदार बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, पोलीस नाईक सचिन आडबल, रविंद्र कर्डीले, पोलीस शिपाई संदीप दरंदले, रविंद्र घुंगासे यांचे पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने शुक्रवारी पहाटे काटवन खंडोबा परिसरात सापळा लावला.

टेम्पो येताच पथकाने अडवून तपासणी केली असता त्यात नऊ हजारांचे एक टन टरबूज, नऊ लाख 45 हजार रुपये किंमतीच्या 105 सुगंधी तंबाखूच्या बँग आढळल्या. सहा लाखांचा टेम्पो, सुगंधी तंबाखू व टरबूज असा 15 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस शिपाई संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व अन्न प्रशासनाने नगर शहरात शुक्रवारी (दि. 1) दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुगंधी तंबाखू, पानमसाला, गुटख्यावर कारवाई केली. या कारवाईत 26 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी तपोवन रोडवरील सुर्यनगरमध्ये एसटी काँलनीमधील घरावर छापा टाकला. यात दोन हजार रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त केला. या प्रकरणी दिलीप शिवाजी पवार (रा. सुर्यनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दुसरी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माळीवाडा वेशीजवळ केली. सुभाष गुलाबराव डागवाले (वय- 48 रा. माळीवाडा) घरामध्ये इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्याने मावा तयार केला जात होता. सर्व साहित्यासह 24 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या