‘कोव्हिड-19 टेस्टिंग बस’च्या निर्मितीत नगरचा हात

jalgaon-digital
2 Min Read

ग्राफिक डिझाईन, व्हिनाईल रॅपिंगसाठी कासार सारोळा गावच्या तरूणाचे योगदान

अहमदनगर (वार्ताहर)- करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील वेगाने वाढणार्‍या करोना रुग्णांच्या तपासणीसाठी मोबाईल कोव्हिड-19 टेस्टिंग बस तयार करण्यात आली आहे. ही पहिली बस मुंबईत कार्यरत झाली असून या बसच्या निर्मितीत नगरच्या युवकाने योगदान दिले आहे. पुण्यातील कृष्णा डायग्नोस्टिक लॅब आणि आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे कोव्हिड-19 टेस्टिंग बस तयार केली आहे. आर्या ट्रान्सपोर्टने यासाठी बस उपलब्ध करून दिली.

बसचे संपूर्ण ग्राफिक डिझाईन, प्रिंटींग आणि व्हीनाईल रॅपिंग नगर जवळील सारोळा कासार गावचे रहिवासी असलेले अभिजित अशोकराव कडूस पाटील यांनी केले आहे. पाटील यांचा पुण्यातील हडपसर येथे इमेज क्रिएशन या फर्मच्या नावाने प्रिंटींग व्यवसाय आहे. करोनाच्या पहिल्या मोबाईल बसच्या निर्मितीत योगदान देता आल्याचे समाधान असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.

मुंबईतील करोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता मुंबईला पहिली मोबाईल कोव्हिड-19 टेस्टिंग बस देण्यात आली आहे. या बसच्या माध्यमातून मुंबईत अधिकाधिक लोकांची चाचणी होणार आहे. वरळी इथल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह बृहन्मुंबई महापालिका (बीएमसी) आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शुक्रवारी (दि. 1) या बसचे उदघाटन केले.

कोव्हिड-19 टेस्टिंग बसमध्ये करोना रुग्णांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. यासह एक्स-रे परीक्षेची सुविधादेखील आहे. करोना चाचणीची सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी लहान चेंबर बनविला आहे. मुंबईत करोना बाधित रूग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या प्रमाणात तपासणीची गरज भासू लागली. ही गरज लक्षात घेता प्रथम बस मुंबईला देण्यात आली आहे.

करोनो व्हायरस शोधण्यासाठी दोन कॉम्बीनेशन सेच्यूरेशन आणि बेस्ड एक्स-रे देखील वापरण्यात येणार आहे. कोव्हिड-19 टेस्टिंग बस आरटी-पीसीआर स्वॅब कलेक्शन सुविधांसह सुसज्ज आहे. या मदतीने झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या भागात करोना चाचणी करणे सोपे जाणार आहे. स्क्रीनिंग दरम्यान उच्च धोका असलेल्या संशयितांना अलग ठेवणे देखील सोपे होईल. क्लाऊड ट्रान्सफॉर्मच्या मदतीने रेडिओलॉजी विभागाचे तज्ज्ञ आणि डॉक्टर आता करोनो विषाणूचे रुग्ण सहज शोधू शकतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *