करोनापेक्षा जलजन्य आजारातही रुग्णांची संख्या अधिक

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर (वार्ताहर)- देशभरात सध्या करोना विषाणूमुळे मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगासंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत एकट्या महाराष्ट्रात नऊ लाख लोकांना जलजन्य आजाराची लागण होत असल्याची बाब समोर आली आहे. राज्यात दरवर्षी जलजन्य आजारामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्ण समोर येत असतात, मात्र ही संख्या मोठी असली तरी एकत्रित स्वरुपात साथी सारखी ती संख्या दिसत नाही. त्यामुळे त्याबद्दल भीतीचे वातावरण नाही. अर्थात या सर्व साथीच्या रोगांवरती मोठ्या प्रमाणावर औषोपचार उपलब्ध असल्यामुळे त्यातील मृतदरही कमी आहेत.

राज्यात जलजन्य आजार म्हणून कॉलरा , गॅस्ट्रो, अतिसार, संसर्गजन्य काविळ,विषम ज्वर यासारखे विविध आजार दरवर्षी उद्भवत असतात. मागील वर्षी राज्यात कॉलरामुळे 245 रुग्णांना लागण झाली. त्यात तिघांचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोची लागण झालेले रुग्ण संख्या 55 हजार 97 इतकी आहे तर अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सात लाख 38 हजार 480 असून संसर्गजन्य काविळची लागण असलेले चार हजार 280 रुग्ण आढळून आले आहेत.

विषमज्वराचे 72 हजार 876 रुग्ण असून लेप्टोस्पायरोसिस 684 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पंधरा जणांचा मृत्यू झाला असून राज्यात एकूण साथीच्या रोगाने मृत पावलेल्या रुग्णांची संख्या अठरा आहे. जलजन्य आजार झालेल्या रुग्णांची संख्या आठ लाख 71हजार 662 आहे.

2017 साली राज्यात जलजन्य आजारामुळे आठ लाख 53 हजार 562 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी दहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. 2018 साली रुग्णांची संख्या घटली असली तरी मात्र मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यावर्षी सात लाख 93 हजार 931 रुग्णांना विविध योजना आजाराची लागण झाली ,तर त्यात चोवीस मृत्यू पावल्याचे दिसते.

लाख लोकसंख्येमागे अवघ्या 103 खाटा
राज्यातील करोना विषाणूंचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयाच्या खाटा उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यात दर लाख लोकसंख्येमागे 103 खाटा उपलब्ध असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येणार्‍या कालावधीत सरकारला जनतेच्या आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा गंभीर विचार करावा लागणार आहे.

एड्सबाधित संख्या घटली
राज्यात गेले काही वर्ष एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या घटत असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी जोखीम गटातील सात हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील तीन चाचणीद्वारे तपासणी करून बाधित झालेल्या आरोग्य संख्या केवळ 23 असल्याचे आढळून आले. हे प्रमाण 0.3 इतके कमी आहे. एडसने मृत्यूचे प्रमाण 3.52 इतके आहेत. 2017 साली 29, तर 2018 साली 26 रुग्ण आढळून आले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *