कोरोनाच्या उद्रेकात दीड महिन्यांपासून तलाठी गायब

jalgaon-digital
3 Min Read

खडकी, खंडाळा, बाबुर्डी बेंद या तीन गावांची ससेहोलपट

अहमदनगर (वार्ताहर)- नगर तालुक्यातील खडकी, खंडाळा आणि बाबुर्डी बेंद या तीन गावांसाठी एकच तलाठी आहे. येथील तलाठी गेल्या दिड महिन्यात एकदाही गावात आले नाहीत. ‘मी राजीनामा दिल्याने येत नाही,’ असे ते सांगतात. तर ‘अद्याप राजीनामा मंजूर नाही. राजीनामा मंजूर होईपर्यंत तलाठ्याने काम केले पाहिजे,’ असे तहसीलदार सांगतात. या राजीनामा नाट्यात खडकी, खंडाळा आणि बाबुर्डी बेंद या तीन गावांची ससेहोलपट सुरू आहे.

नगर तालूक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद आणि खंडाळा या तीन गावांसाठी खडकी हा महसूली सजा आहे. खडकीचे महसूली क्षेत्र 513 हेक्टर, खंडाळयाचे महसुली क्षेत्र 898 हेक्टर व बाबुर्डीचे महसूली क्षेत्र 567 हेक्टर आहे. या तीनही गावात तब्बल दोन हजार खातेदार आहेत. त्यामुळे सात बारा उतारे, पिक पहाणी नोंदी, विविध इतर नोंदी, संजय गांधी, श्रावण बाळ योजनेच्या प्रकरणांची तपासणी अशा विविध कारणांसाठी या गावात तलाठयांची आवश्यकता आहे. सध्या शासनाने हमी भावात हरभरा खरेदी सुरू केल्याने अनेकांना चालू तारेखेचे हरभरा नोदीचे उतारे लागत आहेत.

या ठिकाणी मंगेश मच्छिंद्र कांबळे यांची तलाठी म्हणून नेमणूक केलेली आहे. गेल्या दिड महिन्यांपासून ते एकदाही गावात आले नाहीत. देश कोरोना विषाणूच्या संकटातून जात असताना शासनाने गावोगावच्या तलाठयांवर महत्वाच्या कामांचा भार सोपवलेला आहे. त्यात गावात थांबून जनेतेला सोशल डिस्टन्सींगबाबत कडक सूचना देणे, गावात फवारणी करून घेणे, परदेशातून, परराज्यातून, दुसर्‍या गावांमधून कोणी गावात आले असतील तर त्यांच्या ग्रामसेवक व आरोग्य सेवकांच्या मदतीने नोंदी करणे, वेळ प्रसंगी त्यांना क्वारंटाईन करणे, स्वस्त धान्य वितरण व्यवस्थित होत आहे किंवा नाही.

यावर लक्ष ठेवणे, रस्त्याने पायी जाणारे प्रवासी गावात थांबले असतील तर त्यांची व्यवस्था करणे, जीवनावश्यक वस्तूची विक्री योग्य किंमतीत होत आहे का यावर लक्ष ठेवणे, साठेबाजांना प्रतिबंध करणे, बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी होत असल्यास बार कोड पद्धतीने व्यवस्था करणे, रेशनकार्ड नसलेल्यांना शासकीय धान्य किट पोहच करणे आदी कामे तलाठयांना दिलेली आहेत. पण खडकी, खंडाळा आणि बाबुर्डी बेद येथील तलाठी अहमदनगर येथे वास्तव्यास आहेत.

गावकर्‍यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता मी राजीनामा दिला असल्याचे ते सांगतात. त्यांचा राजीनामा मंजूर नसल्याचे तहसीलदार सांगतात. या नाटयात गेल्या दिड महिन्यांपासून तीन गावांची ससेहोलपट सुरू आहे.

कारवाई करा व दुसरा तलाठी द्या
खडकी तलाठ्याबाबत अनेक तक्रारी आहेत. दीड महिन्यांपासून ते गावात आलेले नाहीत. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेची अनेक प्रकरणे त्यांनी जाणीवपूर्वक गहाळ केली आहेत. खडकी ग्रामपंचायतने रितसर तहसीलकडे तक्रार केलेली आहे. कोरोनाच्या काळात गावोगावचे तलाठी परिश्रम घेत असताना खडकी, खंडाळा, बाबुर्डी बेंद या तीनही गावात एकदाही तलाठी आले नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. आम्हाला दुसरा तलाठी द्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल.
-महेश कोठुळे, ग्रामपंचायत सदस्य, खडकी

राजीनामा मंजूर नाही
खडकीचे तलाठी मंगेश कांबळे यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप तो मंजूर झालेला नाही. मंडल अधिकार्‍यांकरवी त्यांना हे सांगण्यात आले आहे. त्यांचा पगार आजही रितसर सुरू आहे. जोपर्यत राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यत काम करणे नियमानुसार बंधनकारक आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
-उमेश पाटील, तहसीलदार, नगर.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *