तमाशा क्षेत्रातील कोट्यवधीची उलाढाल थांबली

jalgaon-digital
4 Min Read

हजारो ग्रामीण कलाकारांवर उपासमारीची वेळ

संगमनेर (वार्ताहर) – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे व देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे विविध क्षेत्रांवर त्याचा परिणाम होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका राज्यभरातील तमाशा फडांवर आणि त्यामध्ये काम करणार्‍या कलाकारांना बसला आहे. त्यामुळे यात्रांच्या काळातच हा फटका बसला असल्याने अनेकांना येणार्‍या कालावधीत रोजगारासाठी भटकंती करावी लागणार आहे.

लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सर्वच दळणवळण व्यवस्था गतीहीन झाली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवरही शासनाने पूर्णतः बंदी आणली आहे. जिल्हा जिल्ह्यांतील संपर्कही तोडण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. अनेक गावांनी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावांच्या सीमा ही बंद केल्या आहेत. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार अशा धार्मिक ठिकाणी होणारे कार्यक्रमही संचारबंदीमुळे बंद करण्यात आले आहेत. एकूणच सामाजिक जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.

या पार्श्वभूमीवर मार्च, एप्रिल, मे या कालावधीत महाराष्ट्रभर गावोगावी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. सर्वाधिक यात्रा याच काळात असल्यामुळे यात्रांमध्ये आपली कला सादर करून पोट भरणार्‍या तमाशा कलाकारांना आणि फड मालकांना हा कालावधी मोठी पर्वणी समजली जाते. स्थानिक संयोजकांच्यावतीने गावातील यात्रेकरूंसाठी मनोरंजन व्हावे यादृष्टीने तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यासाठीच्या सुपारीही लाखोंच्या घरात देण्यात येतात. त्यामुळे या तीन-चार महिन्यांत तमाशाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

मात्र याच कालावधीत लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे व अनेक जिल्ह्यांत संचारबंदी आदेश देण्यात आल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे तमाशेही थांबले आहेत. याचा विपरीत परिणाम गावोगावच्या ग्रामीण कलाकारांवरही झाला आहे. फडमालक दरवर्षी गावोगावच्या या कलाकारांना अगोदर पैसा देत असतात.

सदरचा पैसा घेऊन हे कलाकार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवतात. आणि तमाशाच्या कालावधीत काम करून सदरची रक्कम फेडत असतात. ही बाब लक्षात घेऊन फड मालकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. ग्रामीण कलाकारांना हे तीन-चार महिने घरी बसावे लागल्यामुळे येणार्‍या कालावधीत त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

कोट्यवधीचा फटका
राज्यात तमाशाच्या निमित्ताने हजारो ग्रामीण कलाकार आपला उदरनिर्वाह करत असतात. एका तमाशासाठी 50 हजारांपासून ते अडीच लाखांपर्यंत सुपार्‍या ठरवण्यात येत असतात. राज्यात असलेले तमाशाचे फड व सुपारीचे दर लक्षात घेता या क्षेत्रातही कोट्यवधीची उलाढाल होत असते. मात्र करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे ही संपूर्ण उलाढाल थांबल्याने या क्षेत्राला कोट्यवधीचा फटका बसल्याचे जाणकार सांगतात.

हजारो व्यवसायिकांना मोठा फटका
यात्रा उत्सवाच्या निमित्ताने गावोगावी मनोरंजनाचे कार्यक्रम करणार्‍या हजारो कलावंतांना याचा फटका बसला आहे. त्यात पाळणा चालविणार्‍या लोकांना सर्वाधिक फटका बसला आहेत. फुगे विकून पोट भरणार्‍या मजुरांची अडचण झाली असून यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर हलवाई व्यवसाय करत असतात. त्यात पेढा, गोडीशेव, रेवडी, चिवडा, जिलेबी यांची उलढाल लाखोंच्या घरात होत असते. तीही यानिमित्ताने थांबली आहे. त्याचबरोबर मनोरंजनाचे छोटे छोटे खेळ करणारे कलाकारही अडचणीत सापडल्याने सर्वांचेच जीवन कठीण प्रसंगात सापडले आहे.

गावाकडची गंमत अडचणीत
तमाशाबरोबरच गावाकडची आदिवासी दलित समाजातील माणसे एकत्र येऊन गंमत सादर करत असतात. त्यासाठी देखील लहान गावांतील वस्तीवरील धार्मिक कार्यक्रमात त्यांना सुपार्‍या घेऊन कार्यक्रम केले जातात. यावर्षी यात्राच होत नसल्यामुळे त्या गमतीही अडचणीत आल्या आहेत. त्याचा मोठा फटका या कलाकारांना बसला आहे. त्यामुळे या कलाकारांना शासनाने मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लाखोंचे कर्ज फेडायचे कसे?
राज्यामध्ये असणारे फडमालक तमाशे सुरू ठेवण्यासाठी कलाकारांना अगोदर पैसे देत असतात. त्यासाठी अनेक फडमालक सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असतात, तर काही फडमालक बँकेकडून कर्ज घेत असतात. आता मात्र पूर्ण सिझन तमाशाशिवाय जात असल्यामुळे व येत्या महिन्यानंतर पावसाळा सुरू होत असल्यामुळे पुढील चार-पाच महिने तमाशाचे कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे घेतलेल्या कर्जावरचे व्याज भरणे देखील अनेक फड मालकांना अडचणीचे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी या फड मालकांना आधार देण्याची गरज आहे. यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे, कलाकारांना सानुग्रह अनुदान देणे. फड मालकांना आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *