Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोनाच्या गैरसमजामुळे पोल्ट्री व्यवसायाला जबर फटका

Share
कोरोनाच्या गैरसमजामुळे पोल्ट्री व्यवसायाला जबर फटका, Latest News Corona Problems Poltry Loss Taklibhan

व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले; भांडवली गुंतवणूक गोत्यात

टाकळीभान (वार्ताहर) – समाज माध्यमातून पसरवलेल्या गैरसमजातून राज्यासोबतच श्रीरामपूर तालुक्यात कृषिपूरक उद्योग म्हणून निवडल्या गेलेला पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना या अफवेची मोठी किंमत मोजावी लागत असून पोल्ट्री व्यवसायच कोलमडून पडत आहे. त्यामुळे सरकारने या व्यावसायिकांना पुन्हा उभारी देण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षात श्रीरामपूर तालुक्यात पोल्ट्री व्यवसायानेे चांगलेच बस्तान बसविले होते. त्यामुळे शेतकर्‍यांचेे जीवनमान उंचावण्यास मदत होत होती. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी शेती बँकेकडे तारण ठेवून बँकेचे कर्ज घेवून पोल्ट्री व्यवसायासाठी भांडवल गुंतवणूक केलेली आहे.

काहींनी अंडी देणार्‍या लेअर चिकनची तर काहींनी कटींग बॉयलर चिकनची आपआपल्या पसंतीनुसार निवड करुन व्यवसाय सुरु केलेले आहेत. अंड्यावरील कोंबडी पालन व्यवसायासाठी मोठी भांडवल गुंतवणूक खर्च झालेला आहे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूंचा फैलाव चीनमध्ये सुरु झाला. त्यामुळे चीनमध्ये मानवी मृत्यूंचे तांडव सुरु झाले. भारतात या विषाणूबाबत सोशल मिडीयावर माहिती येऊ लागली. कोणी सुपिक बुध्दीवंताने बॉयलर चिकन खाल्यामुळे कोरोना होतो असा गैरसमज पसरविला. हा मसेज फॉरवर्ड होत गेला आणि बघता बघता बॉयलर चिकन विक्रीचा खप कमी होऊ लागला. आणि पहाता पहात या बॉयलर चिकनची विक्रीच ठप्प झाली. शेतकर्‍यांच्या शेडमधील 42 ते 45 दिवसात विक्रीस तयार झालेले पक्षी उचलण्यास कंपनी दिरंगाई करु लागली. पर्यायाने खाद्याचा खर्च वाढू लागला व जास्त वजन वाढू लागल्यामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढू लागले.

पोल्ट्री व्यावसायिकांचे उत्पन्न घटले व त्यामुळे बँकेचे कर्जाचे हाप्ते थकु लागले आहेत. 42 ते 45 दिवसात पक्ष्याच्या प्रति किलो वाढीसाठी सरासरी 65 रुपये खर्च होतो. बॉयलर कोंबडीमुळे कोरोना होतो या अफवेमुळे खवय्यांनी बॉयलर चिकनलाच बाय बाय केला आहे. 100 रुपयात तीन किलो वजनाचा एक पक्षी काही ठिकाणी मिळत आहे तर काही ठिकाणी 10 रुपये किलोलाही भाव मिळत नाही. या व्यवसायात गेल्या काही दिवसात विविध कंपन्यांनी प्रवेश केला आहे.

मात्र कोरोनाच्या आफवेने तयार मालाची विक्री होत नसल्याने अनेक कंपन्या तोट्यात गेल्याने त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. शेतकर्‍यांना पुरवठा केलेले 15 दिवसाच्या आतील पक्षी मारण्याचे आदेश कपन्यांनी दिले आहेत तर पोल्ट्री चालकाला होत असलेला खाद्य पुरवठा व वैद्यकीय सेवा बंद केल्याने महागडे खाद्य पक्ष्यांना देऊन संगोपन करणे व पुन्हा तयार मालाला बाजारपेठ शोधणे जिकरीचे काम झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना मोठा तोटा सहन करुन उत्पन्नही थांबले आहे व बँकेच्या व्याजाचाही भुर्दंड सहन करावा लागत असून संपूर्ण आर्थिक बजेट कोलमडल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

त्यासोबतच संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे हे सरकारने घोषवाक्य केल्याने अंडी देणार्‍या लेअर कोंबडीच्या कुकुटपालन व्यवसायला गेल्या काही वर्षात चालना देण्यात आली. त्यामुळे शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांनी यासाठी भांडवली गुंतवणूक केली. गेल्या वर्षापासून खाद्याचे भाव भरमसाट वाढल्याने हा व्यवसायही तोट्यातून सुरु आहे. त्यासोबतच उत्पादन वाढल्याने बाजारपेठेत अंड्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडल्याने हा व्यवसायही अखेरच्या घटका मोजत आहे.

कोरोनाचा बॉयलर चिकनशी संबंध जोडून विनाकारण अफवा पसरवली गेल्याने पोल्ट्री व्यवसाय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहेत. वास्तविक बॉयलर चिकन व कोरोना विषाणूंचा काहीही संबंध नाही हे शासनाने व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. मात्र बॉयलर चिकनबाबतच्या आफवेने पोल्ट्री व्यवसायालाच घरघर लागली. यातून बँक कर्जाचे हप्ते थकून बेरोगार तरुण नैराश्यात जाणार असल्याने सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-सुरेश पवार, पोल्ट्री व्यावसायिक, टाकळीभान.

बॉयलर चिकन खाल्याने कोरोना व्हायरस होतो ही अफवा पसरवून समाजात गैरसमज पसरविणार्‍या दुष्ट प्रवृत्तीचा शासनाने शोध घेऊन त्याला कठोर शासन झाले पाहिजे. पोल्ट्री व्यवसायावर आफवेने गंडांतर आले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना प्रचंड तोटा सहन करावा लागत असून सरकारने झालेल्या तोट्याची नुकसान भरपाई द्यावी व या उद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न करावेत.
– संदीप कोकणे, पोल्ट्री व्यावसायिक, टाकळीभान.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!