Friday, April 26, 2024
Homeनगरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर वसुली, ऑनलाईन कामांना मुदतवाढ मिळावी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर वसुली, ऑनलाईन कामांना मुदतवाढ मिळावी

ग्रामसेवक युनियनची मागणी, मासिक सभाही स्थगित ठेवाव्यात 
अहमदनगर ( प्रतिनिधी ) – कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी सध्या संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली आहे.  महाराष्ट्रात शहरे व गावे ठप्प  झाली असून शासन आदेशानुसार ग्रामसेवक ग्रामीण भागात उपाययोजना अंमलात आणत आहेत.  त्यामुळे या काळात कर वसुली, ऑनलाईन कामांना मुदतवाढ द्यावी तसेच मार्च,  एप्रिल मधील मासिक सभा स्थगित कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नगर जिल्हा शाखेने केली आहे.  याबाबत युनियनचे राज्य अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष एकनाथ ढाकणे, जिल्हा सचिव अशोक नरसाळे यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, संचारबंदी व कलम 144 लागू असल्याने ग्रामपंचायत स्तरावरील  मार्च व एप्रिल 2020 मधील मासिक सभांना स्थगिती देण्यात यावी, संगणक ऑपरेटरचा संप व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाईन कामांना किमान दोन महिने मुदतवाढ द्यावी,  सध्या संपूर्ण जनजीवन ठप्प असल्याने ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी,  व्यवसाय कर, टॉवर, हॉटेल कर आदी वसुलीस पुढील दोन महिने स्थगिती द्यावी. अन्य शासकीय कर्मचार्यांच्या प्रमाणे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनाही ग्रामपंचायत पातळीवरील भेटी, कामकाज याबाबत सवलत देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या