Thursday, April 25, 2024
Homeनगरपोलिसांनी सक्तीने केले नगर शहर बंद

पोलिसांनी सक्तीने केले नगर शहर बंद

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर कोरोनाच्या विरोधात उपाययोजना सुरू केल्या. नगर शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृहे, व्यायामशाळा बंद आहेत. मात्र, वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने पोलिसांच्या माध्यमातून गुरुवारी दुपारनंतर उघडी असलेली दुकाने बंद केली. पोलिसांनी रस्त्यावर फिरून नागरिकांना दुकाने तसेच खासगी कार्यालये बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे दुपारनंतर नगर शहरात कडकडीत बंद आढळून आला तर रस्ते पूर्णपणे ओस पडले होते.

दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटेक यांनी तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना याबाबत सूचना करून तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प हद्दीतील तसेच, ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांनी एमआयडीसी व नगर तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना बंद बाबत आदेश दिले.

- Advertisement -

सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी पोलीस फौजफाट्यासह आपापल्या हद्दीतील दुकाने, सेवा आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, संग्रहालय, इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश दिले.

उपअधीक्षक मिटके यांनी तिन्ही पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच, राज्य राखीव दलाची तुकडी शहरा तैनात करून केडगाव परिसर, माळीवाडा, कापडबाजार, सर्जेपुरा, बालिकाश्रमरोड, पाईपलाईन रोड, सावेडी, नवीपेठ, गांधी मैदानपरिसर, दाळमंडई, भिस्तबाग, तसेच, भिंगार व एमआयडीसी परिसरातील सर्व दुकान, सेवा आस्थापना, उपहारगृहे, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल्स आदी बंद केले.

काही ठराविक चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. चौकात गर्दी होणार नाही, याची खबरदारी पोलीस घेत होते. गर्दी दिसल्यास ती हटविण्याचे काम पोलीस करीत होते. त्यामुळे रस्त्यांवर कामानिमित्त घराबाहेर पडलेले लोक दिसत होते. ज्यांनी दुकाने बंद केली नाही अशा व्यक्तींविरोधात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या