Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आता गर्दीवर नियंत्रण

Share
आता गर्दीवर नियंत्रण, Latest News Corona Problems Crowd Control Target Ahmednagar

विविध कार्यक्रमांवर बंदी, हॉटेल्स, बिअरबारही बंद राहणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरसह राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेण्याची तसेच गर्दीची ठिकाणे टाळण्याची गरज आहे. 31 तारखेपर्यंत म्हणजे पुढचे 10 दिवस आपल्याला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. हे दहा दिवस फार महत्त्वाचे आहेत. सध्या राज्यात कोरोना साथीचा दुसरा टप्पा आहे. आपण तिसर्‍या टप्प्यात जाऊ नये, यासाठी कोरोनासंगे सुरू असलेली लढाई आणखी तीव्र करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही पावले उचलली आहेत.

या दरम्यान, नगर शहर, श्रीरामपूर, संगनमनेर, अकोले, राहुरी, पाथर्डीसह अनेक शहरात पोलीस रस्त्यावर उतरून त्यांनी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिंळाला. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 अन्वये विविध बाबींसाठी बंदी आदेश लागू केले आहेत. हे आदेश लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणार्‍यावर दंडनीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

हा आदेश खालील बाबतीत लागू होणार नाहीत. यात शासकीय, निमशासकीय कार्यालये सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅण्ड, बस थांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे, अंत्यविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान, दुध, दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय, पेट्रोलपंप, जीवनावश्यक वस्तू, विक्री/वितरीत करण्यास परवानगी राहील.

(गर्दी टाळून), इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणा-या सर्व स्पर्धा परिक्षा विदयापिठ, विश्व विदयालयाच्या परीक्षा देणारे विदयार्थी व संबंधीत शैक्षणीक काम पाहणारी व्यक्ती. प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिक, नियतकालीके, टिव्ही न्युज चॅनेल) कार्यालय चालू राहतील. विदयार्थी साठी खानावळ तसेच महाविदयालय, वस्तीगृह यामधील कॅन्टींग/मेस (केवळ परीक्षार्थी).

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायादा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत, असे प्रवासी नगर जिल्ह्यामध्ये ही प्रवास करुन आलेले आहेत व काही प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत.

त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसंर्ग व प्रादुर्भाव परसण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ न होऊ देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी जाणे वास्तव करणे इ. बाबी टाळणे आवश्यक आहे. त्याअर्थी कोरोना विषाणूचे प्रसाराचे माध्यम पाहता हा विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस-इसमास त्याच्या संपर्कात आलेने होण्याची शक्यता विचारात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन जिल्ह्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी हे बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय, कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 43 (1) मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मीक, क्रिडाविषयक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस इत्यादींना मनाई राहील. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल तसेच अन्य विवाह स्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यास बंदी राहील. जिल्ह्यात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग यांच्या आयोजनास बंदी राहील. मंदिर, मस्जिद, गुरुव्दारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असणारे दुकाने/सेवा आस्थापना, उपहारगृहे / खाद्यगृहे/ खानावळ, शॉपींग कॉम्प्लेक्स मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडीओ पार्लर्स, ऑनलाईन लॉटरी सेंटर इत्यादी बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व परमीट रुम बिअरबार बंद ठेवण्यात येत आहेत. सर्व नागरिकांना विहीत कारणाशिवाय अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.

अटीतटीचा आठवडा
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यासाठी पुढील आठ दिवस हे अटीतटीचे राहणार आहे. या काळात कोरोनाचा संचार रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यया गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी संयम पाळून घराच्या बाहेर पडू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

शमी गणपती मंदिरही बंद
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील जवळजवळ सर्वच मंदिरे बंद करण्यात आली आहेत. माळीवाड्यातील विशाल गणपती, शनी मंदिरापाठोपाठ आज दिल्लीगेटचे शमी गणपती मंदिरही भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 31 मार्चपर्यंत हे मंदिर बंद ठेवले जाणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रंगनाथ नगरकर, उपाध्यक्ष शरद देशमुख, सचिव विनायक देशमुख, दिलीप निसळ, राजेंद्र देशमुख, पुजारी प्रमोद रेखी यांनी ही माहिती दिली.

दाढी-कटिंगची दुकाने बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील दाढी-कटिंगचे दुकान बंद ठेवण्याचा निर्णय आज गुरूवारी नाभिक संघटनेने घेतला. 20 ते 23 मार्चपर्यंत सलून दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. देखील दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस हेअर सलून बंद ठेवण्यात येणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अहमदनगर शहर व ग्रामीण असोसिएशनने आजच्या बैठकीत घेतला. जिल्हा प्रशासनाच्या बंदच्या अहवानाला प्रतिसाद म्हणून सामाजिक भान जपत नुकसानीचा विचार न करता परिस्थिती नियंत्रणात आण्याकरीता हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष अनिल निकम यांनी सांगितले.

बँकेत केवळ पाच ग्राहकांना प्रवेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांनीही खबरदारी घेतली आहे. बँकेतील प्रत्येक अधिकारी मास्क बांधूनच कामकाज करत आहे. बँकेत येणार्‍या ग्राहकाच्या हातावर एन्ट्रीपूर्वीच सॅनीटाईझरचे दोन थेंब टाकले जात आहेत. मगच कस्टमरला बँकेत प्रवेश दिला जातो. बँकेत एका वेळी फक्त पाच कस्टमर सोडण्याचे फर्मान बँकेने काढले आहे. बँकेच्या गेटवर वॉचमन उभा करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. चितळे रोडवरील तेलीखुंटच्या बँक ऑफ इंडियात याची अंमलबजावणी सुरू असल्याचे आज पहावयास मिळाले. त्यामुळे बँकेबाहेरही कस्टमरची गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

झेडपी, पंचायत समितीत अभ्यागतांना बंदी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. पाटील यांनी नगरच्या झेडपीच्या मुख्यालयात आणि पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिक, अभ्यागत यांना जवळपास बंदी आहे. मात्र, आवश्यक टपाल, फाईल, निवेदन देण्यासाठी मुख्यालयाच्या गेटमध्ये असणार्‍या टपाल कक्षात त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुका पातळीवरून येणार्‍यांनी त्याचा वापर करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचा विषाणूचा जिल्ह्यात फैलाव टाळण्यासाठी विविध पातळीवरून उपाययोजना करण्यात येत आहेत. याचा एकभाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आणि पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण भागातून सामान्य नागरिक, कर्मचारी अधिकारी यांनी गर्दी करून नयेत, गर्दी झाल्यावर सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी काढले आहेत. जिल्हा परिषद मुख्यालयातील कामासाठी, चौकशीसाठी टोल फ्री नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले असून यासह जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी कोरोना आजाराविषयी चुकीची माहिती प्रसिध्द करून नयेत, असे पाटील यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

शिर्डीत दर गुरूवारी निघणारी साईबाबांची पालखी स्थगित

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने शिर्डी शहरात प्रत्येक गुरुवारी निघणारी साईबाबांची पालखी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे साई संस्थान प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले . दरम्यान, साईबाबांच्या हयातीपासून निघणारा पालखी सोहळा संस्थानच्या इतिहासात प्रथमच बंद करण्याची घटना घडल्याने कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचली आहे. कोरोना व्हायरसने देशातच नव्हे तर राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात कोरोणा ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. अशातच जिल्ह्यात कोरोणाचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हाय अलर्ट जारी केला आहे.गुरुवार दि. 19 रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर सायंकाळी पाच वाजता शिर्डी शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने बंद करण्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. गुरुवारी साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांच्या हयातीपासून द्वारकाबाई ते चावडी अशी काढण्यात येणारी पालखी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये स्थगित करण्यात आली आहे.

एकिकडे शेकडो वर्षांची परंपरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडित झाल्याने भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून तसेच या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे काही भाविकांनी बोलून दाखविले. जमावबंदीचा आदेश लागू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असावा असे ग्रामस्थांनी सांगितले. साईबाबांच्या श्रद्धेपोटी काही भाविकांनी पालखी सोहळा बघण्यासाठी गर्दी केली होती मात्र साईसंस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मंदिर परिसरातून हटविण्यात आले आहे. तसेच भाविकांनी शिर्डीत येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!