Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सोशल मीडियावर अफवा पसरवल्या प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल

Share
फेसबुकवरुन अफवा पसरवली; तरुणावर गुन्हा दाखल, Latest News Facebook Rumor Youth Action Sonai

कोरोना धसका : मनसेच्या शॅडो मंत्र्यासह चौघांविरोधात गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी) –  कोरोना व्हायरसची अफवा पसरविणारी पोस्ट तसेच संशयित रुग्णांची नावे सोशल मिडियावर व्हायरल केल्याप्रकरणी बुधवारी (दि. 18) रात्री नगरमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा शॅडो कॅबिनेट मंत्री संजीव पाखरे यांच्यासह चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरच्या कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हे दोन्ही गुन्हे दाखल झाले आहेत. संजीव पाखरे, तेजस जीप काटे, रवींद्र चौबे, सचिन राऊत (पूर्व नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या चौघा आरोपींचे नावे आहेत. संजीव पाखरे हे पुण्यातील पौंड रोडचे रहिवासी आहेत. मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळात त्यांच्यावर कृषी व दुग्धविकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. 14 मार्च रोजी नगरच्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे तीन संशयित पळून गेले होते.

त्यांची नावे असलेले पत्र जिल्हाशल्यचिकित्सकांनी तोफखाना पोलिसांना दिले होते. कोरोना संशयित हे समाजाच्यादृष्टीने घातक सिध्द होऊ शकतात, त्यामुळे त्यांना तत्काळ पकडून जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करावे असे या पत्रात नमूद केले होते. याच पत्रात कोरोना संशयितांची नावे होती. हे पत्र जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख राहुल द्विवेदी यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पाखरे यांनी स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून सोशल मीडियावर व्हायरल केले.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून जिल्हा रुग्णालयातील रेकार्ड किपर कैलास काशिनाथ शिंदे (वय- 39 रा. कल्याणरोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिंदे यांच्या फिर्यादीवरून मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा शॅडो मिनिस्टर पाखरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना व्हायरसची रक्त तपासणी करणारी केंद्र असा उल्लेख केलेली हॉस्पिटलच्या नावाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नगरमध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिघा आरोपींविरोधात पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा नोंदविला आहे. तेजस जीप काटे, रवींद्र चौबे, सचिन राऊत अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस हवालदार तन्वीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. एका व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर हॉस्पिटलची यादी टाकून त्याखाली कोरोना रक्त तपासणी केंद्र असा उल्लेख असलेली पोस्ट नगरमध्ये व्हायरल झाली. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून त्याचे उल्लंघन केले म्हणून 188 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना (कोविड 19) व्हायरसची तपासणी केंद्रे या मथळ्याची पोस्ट नगर शहरात व्हॉट्सअ‍ॅप आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!