Friday, April 26, 2024
Homeनगरमुंबईहून आलेल्यांनी उडविली नगरकरांची झोप

मुंबईहून आलेल्यांनी उडविली नगरकरांची झोप

श्रीरामपूर, नगर, अकोले, संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यात करोनाचे रूग्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मध्यंतरी करोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले असतानाच, गत दोन दिवसांपासून मुंबई-पुण्याहून आपल्या गावी परतणारी मंडळी आणि पाहुण्यांमुळे करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या नव्या करोना बाधितांनी नगर जिल्ह्यातील नागरिकांची झोप उडविली आहे. तसेच वाढत्या संख्येमुळे प्रशासनही चिंताग्रस्तही झाले आहेत. अन्य जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात येणार्‍यांबाबत खबरदारी घेण्यात येऊन त्यांना वेळीच क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सोमवारी दिवसभरात नगरच्या जिल्हा रुग्णालयातील करोना तपासणी प्रयोग शाळेत केलेल्या नमुने तपासणीत मुंबई-पुण्यावरून आलेल्या आठ जणांना करोनाची बाधा झालेली आहे. यामुळे जिल्ह्याबाहेरून आलेल्या बाधितांचा आकडा 16 वर पोहचला असून बाहेरून आपल्या गावी परतणार्‍या आणि पाहुण्यांमुळे नगर जिल्हावासीयांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान जिल्ह्यातील मूळ व्यक्तींपैकी करोना बाधितांचा संख्या 75 असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कळविण्यात आले आहे.
सोमवारी (सकाळी) आलेल्या अहवालात जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या पाच व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. याशिवाय, दोन रुग्णांचे रिपीट अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील 31 वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 33 वर्षीय पुरुष, अकोले तालुक्यातील ढोकरी येथील 35 वर्षीय पुरुष, नगर तालुक्यातील वाकोडी येथील 43 वर्षीय पुरुष आणि निंबळक येथील 30 वर्षीय महिला करोना बाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. मात्र, या व्यक्ती मुंबईहून नगर जिल्ह्यात आल्या होत्या.
याशिवाय नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील करोना बाधित व्यक्तीचा दहा दिवसानंतरचा स्त्राव चाचणी अहवालही पॉझिटिव आला आहे. घाटकोपर येथून लिंगदेव (अकोले) येथे आलेल्या एका व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयाने त्याची पुन्हा येथे चाचणी केली असता तो बाधित असल्याचे आढळून आले आहे.
त्यानंतर सायंकाळी आलेल्या अहवालात मुंबईहून आलेल्या दोन आणि पुण्याहून आलेल्या एक अशा तीन व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहेत. उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मुंबईतील वरळी येथून पिंपळगाव लांडगा येथे आलेला 62 वर्षीय व्यक्ती, विक्रोळी ( मुंबई ) येथून संगमनेर येथे आलेली 68 वर्षीय महिला आणि घोरपडी ( पुणे) येथून श्रीगोंदा फॅक्टरी येथे आलेला 32 वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बाहेरील जिल्हयातून आलेल्या आतापर्यंत एकूण 16 व्यक्ती बाधीत आढळून आले असल्याची माहिती अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 2 हजार 65 स्त्राव चाचणी नमुने तपासले असून त्यापैकी 1 हजार 922 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 15 नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही तर 25 अहवाल फेटाळण्यात आले आहेत. आतापर्यंत 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या नगर येथे 26 तर नाशिक येथे तीन रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सात आणि बाहेरील जिल्ह्यातील एक असे आठ रुग्ण दगावले आहेत.

वडाळा महादेव येथे आढळला दुसरा करोना पॉझिटिव्ह रुग्ण

वडाळा महादेव (वार्ताहार)- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे औरंगाबादहुन आलेल्या 32 वर्षीय तरूणाचा करोना अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्यानंतर काल मुंबईहून आलेल्या व वडाळा महादेव येथील शाळेत क्वारंटाईन केलेल्या एका तरुणाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील वडाळा महादेव येथे मुंबई येथून आलेला त्या तरुणास येथील मराठी शाळेमध्ये विलगीकरण कक्षामध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. दोन-तीन दिवसांनी त्याला अस्वस्थ वाटत असल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी केली. त्याच्यासह आणखी एका तरुणामध्ये करोनाची लक्षणे दिसल्याने या दोघांनाही अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्या घशाचे स्राव घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयाला त्याचा अहवाल काल प्राप्त झाला. त्यावरून त्यातील एका तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर पहिल्या रुण्णाच्या संपर्कात आलेल्या नेवासा रोड वरील धार्मिक आश्रमातील दोन व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहे.

वडाळा महादेव येथे सध्या दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून एक औरंगाबाद येथून आलेले धार्मिक पंथीय व्यक्ती असून दुसरा तरुण हा मुंबई येथून आलेला आहे.
प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील व आरोग्य विभागाच्या पथकाने वडाळा महादेव येथे भेट देऊन ग्रामपंचायत पदाधिकारी यांची भेट घेतली व शासकीय आदेशाचे काटेकोर पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहे. यावेळी सरपंच सौ. अरुंधती पवार, कामगार पोलीस पाटील मार्था राठोड, उपसरपंच कृष्णा पवार, सचिन पवार आदींसह ग्रा. प. पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

वडाळा महादेव, निपाणी वडगाव तसेच अशोकनगर फाटा परिसराला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद तसेच इतर राज्यांमधून असंख्य नागरिक गावाकडे येत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना करोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारीचा तसेच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी निपाणी वडगाव जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करून ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय आदेशाप्रमाणे करोना कमिटी तयार केली आहे. या कमिटीच्या माध्यमातून येथील जि. प. शाळेत एकूण 68 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच वडाळा महादेव येथील जि. प. शाळेत पंचवीस व्यक्तींना क्कॉरंटाईन करण्यात आले आहे.

अकोलेत दोन करोना रुग्ण

मुंबईहून गावी येणार्‍यांनी अकोलेकरांचे टेन्शन वाढविले

अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यातील लिंगदेव पाठोपाठ ढोकरी येथे मुंबईहून आलेल्या एका इंजिनिअरचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अकोलेतील करोना बधितांची संख्या दोन झाली आहे. अर्थात मूळ ढोकरी येथील इंजिनिअर तरुण गावात न जाता थेट दवाखान्यात दाखल झाल्यामुळे ढोकरीवासीयांचे संकट टळले आहे. तर दुसरीकडे लिंगदेव येथील करोना बाधिताच्या संपर्कातील दहा पैकी सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे लिंगदेववासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे तर प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

घाटकोपर येथून 57 वर्षीय शिक्षक लिंगदेव या मूळगावी आला होता. तेथे त्याला क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते. खासगी प्रयोग शाळेच्या तपासणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुक्यातील तो पहिला करोना बाधित रुग्ण ठरला. प्रशासनाने तातडीने लिंगदेव गाव लॉकडाऊन केले. सर्व ग्रामस्थांना होम क्वारंटाइन करून ठेवण्यात आले. संबंधित शिक्षक व त्याच्या निकट संपर्कातील दहाजण अशा 11 जणांना नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान, शासकीय प्रयोग शाळेच्या तपासणीतही त्या शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्याच्या बरोबरच्या दहा जणांपैकी सात जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. तर अन्य तीन अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.

दरम्यान, शनिवारी मूळ ढोकरीचा रहिवासी असणारा व सध्या नवी मुंबईत एका बांधकाम कंपनीत काम करणारा इंजिनिअर घनसोळी येथून ढोकरी येथे यायला निघाला. अकोल्याला जाण्यासाठी पहाटे 5 वाजता निघाला, तो अंबरनाथ येथे आला. तिथे त्याने अकोलेला जाण्यासाठी गाडीची शोधाशोध सुरू केली. तिथे त्याची भेट संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भाजीपाला वाहतूक करणार्‍या गाडीच्या चालकाशी झाली. पण त्याला थोडा निघायला वेळ होता.आणि त्याला जेवण करायचे होते म्हणून निघण्यास थोडा वेळ झाला. मग हे दोघेही 11 वाजता अंबरनाथहून निघाले. ते थेट 4 वाजता अकोल्याला पोहचले. त्याने गाडी अकोले ग्रामीण रुग्णालयासमोरच उभी केली. त्या इंजिनिअरला 15 तारखेपासून ताप येत होता.

म्हणून त्याने ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला, दरम्यान त्याने आपल्या वडिलांना अकोलेत बोलावून घेतले होते, मग ते दोघेही ग्रामीण रुग्णालयात पोहचले, पण तेथे वैद्यकीय अधिकारी कोणीच नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी चौकशी सुरू केली. दरम्यान, अकोले ग्रामीण रुग्णालयात त्यांना केस पेपर काढून देण्यात आला. मग तेथील उपस्थित अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर तातडीने तो इंजिनिअर व त्याचे वडील थेट नगरला पोहचले. तेथे त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आल्यावर काही लक्षणांवरून त्या इंजिनिअरची करोना तपासणी करण्यात आली.

इंजिनिअर तेथेच रुग्णालयात दाखल होते त्याचा आज सोमवारी सकाळी अहवाल प्राप्त झाला व तो अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे,पं.स. चे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे, अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोगरे यांची अकोले तहसील कार्यालयात तातडीची बैठक पार पडली. यामध्ये घणसोळी नवी मुंबई ते अकोले दरम्यानच्या या इंजिनिअरच्या प्रवासाची सखोल माहिती घेण्यात आली.

याआधारे त्याच्या संपर्कात आलेल्या माणसांचा शोध प्रशासनाने सुरू केला तसेच त्याचे मूळ गाव असलेल्या ढोकरी येथेही तो रहात असलेला भाग लॉक करण्यात आला.तो मुबंईहून आल्यानंतर ढोकरीला गेला नव्हता ही बाब समोर आली असली तरी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही उपाययोजना आखल्या आहेत. तर त्याच्यासोबत असणारे त्याचे वडील शेतकरी असून त्यांचे पण अहमदनगर येथे घशाचे स्रावचे नमुने घेण्यात आले आहेत तर पेमगिरी, ता. संगमनेर येथील चालकास संगमनेर प्रशासनाने क्वारंटाइन केले आहे.

त्यामुळे अकोलेतील करोना रुग्णाची संख्या दोन झाली आहे. हे दोघेही रुग्ण मुबंईहून आलेले आहेत. अकोलेत चोरून मोठ्या संख्येने मुबंई परिसरातून लोक गावी परतत आहेत.त्यामुळे अकोले तालुक्याला करोनाचा धोका वाढत चालला आहे.त्यामुळे मुबंईहून अकोलेत येत असणार्‍यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.एक तर त्यांना तालुक्यात प्रवेश देता कामा नये किंवा सक्तीने तालुक्याच्या सीमेवर सरकारी निगराणीत क्वारंटाईन करणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या