Saturday, April 27, 2024
Homeनगरनगर, संगमनेरचे दोघे पॉझिटिव्ह

नगर, संगमनेरचे दोघे पॉझिटिव्ह

रिक्षाचालक तसेच सुभेदार गल्लीतील ‘त्या’  महिलेचा दहा दिवसांनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील एक रिक्षाचालक (वय 56) आणि शहरातील रहमत नगर येथील बाधीत व्यक्तीची पत्नी करोनाचा अहवाल बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी 68 वर गेली आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या 48 संशयीतांचे अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले आहेत. यात 45 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील कोरोना बाधीत वृद्ध महिलेचा 10 दिवसानंतरचा अहवाल मात्र पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित नगर आणि संगमनेरमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
नगर शहरातील एका रिक्षा चालकाला करोनाची लागण झाली आहे. सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याला दोन दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. हा व्यक्तीही बाधीत आढळून आला. तर संगमनेरमधील रहमत नगरतधील बाधित व्यक्तीचा पत्नीला देखील करोनाची लागण झाली आहे. यासह निगेटिव्ह अहवाल आलेल्यामध्ये कोपरगाव, नगर ग्रामीण, संगमनेर, जामखेड, नेवासा, पाथर्डी, राहुरी आणि कर्जतमधील अन्य रुग्णांना दिलासा मिळाला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवाल स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर, संगमनेर बंद राहणार
जिल्ह्यात आतापर्यंत 68 करोना बाधीत रुग्ण आढळलेले असून यातील 49 रुग्णांनी करोनावर मात केलेली आहे. जिल्ह्यात नगर शहर आणि संगमनेर या ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळल्याने या ठिकाणी चार कंटेन्मेंट झोन लागू आहेत. जिल्ह्यात उद्यापासून सर्व दुकाने सुरू होणार असली तरी कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व काही बंद राहणार आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या