Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोनाविरोधात आज जनता कर्फ्यू…देश थांबणार!

Share

नवी दिल्ली/मुंबई/अहमदनगर (प्रतिनिधी) – देशभर पाय पसरणार्‍या कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देश रविवारी स्वयंस्फूर्तीने सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली असून गेली दोन दिवस मंदावलेली दैनंदिन जीवनाची चाके पूर्णत: थांबणार आहेत. पंतप्रधानांसह देशभरातील नेत्यांनी सामान्य जनतेला घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून कोरोना संसर्गाच्या संकटाशी धीराने मुकाबला करा, घाबरू नका व सतर्क राहा असे सुचविले आहे. दरम्यान, देशात आणि राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत शनिवारी 50 रूग्णांची भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही बाजारपेठा दोन दिवसांपासून बंद आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश बजावले असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घरातच थांबा, अन्यथा कठोर कारवाई

जिल्हा प्रशासनाचा इशारा : सर्वांच्या भल्यासाठी सहकार्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल कठोर परिश्रम करत आहेत. त्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मात्र, अद्यापही या विषाणू संसर्गाचे गांभीर्य काहींच्या लक्षात येत नसल्याचे दिसत आहे. यामुळे पुढील काळात कठोर उपाययोजना कराव्या लागतील, घरात बसा अन्था कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी दिला. नागरिकांनी या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वत:च्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शनिवारी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे आदी उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाले, नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागासह आवश्यक यंत्रणा धावपळ करीत आहेत. विविध आस्थापना बंद करण्याचे आदेश यापूर्वीच जारी केले आहेत. मात्र, सुटी समजून नागरिक इतरत्र विनाकारण फिरताना दिसत आहे. हे चित्र जिल्हावासीयांसाठी धोका वाढविणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी या विषाणू प्रादुर्भावाचे गांभीर्य समजून घ्यावे आणि घराबाहेर पडणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील 194 व्यक्तींची कोरोनाबाधाची तपासणी करण्यात आली आहे. आज (शनिवारी) एनआयव्हीकडून आणखी 25 व्यक्तीचे स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटीव आला आहे. अद्याप 45 व्यक्तींचे स्त्राव नमुना अहवाल येणे बाकी असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर निगेटीव अहवाल आलेल्या व्यक्तींना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या हातावर तसे शिक्के मारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

35 दुकाने अन् 132 व्यक्तींवर कारवाई
शहरात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्ल्ंघन करणार्‍या 35 पेक्षा जास्त दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तर विनाकारण बंदी आदेश डावलून रस्त्यांवर फिरणार्‍या 132 जणांवर कारवाई करण्यात आली. बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात 12 पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

संशयातांची केवळ तपासणी
परदेशातून परत आलेल्या व्यक्तींची केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी केली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णालयात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी करुन घ्यावी. याबाबत कोणत्याही अफवा अथवा खोटी माहिती पसरवणार्‍यांवर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करेल, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, माहितीची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण, अर्धवट, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणार्‍याविरोधात जिल्हा पोलीस दलाचा सायबर पोलीस विभाग कार्यवाही करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

जास्त प्रवासी वाहतूक करणार्‍यांवर कारवाई
अनेक खाजगी वाहतूक करणार्‍या वाहनांमार्फत जास्त प्रवाशी वाहतूक केल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात परिवहन विभाग आणि पोलीस विभाग अशा वाहनांवर कार्यवाही करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्याठिकाणी जास्त संपर्क येत असेल, तेथे विषाणू संसर्ग प्रसाराचा धोका जास्त आहे. त्यामुळे यासंदर्भातील काळजी नागरिकांनीही घ्यावी, असे ते म्हणाले.

बंद बाबत एमआयडीसी सकारात्मक
जनता कर्फ्यू आणि जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंत राज्यातील अनेक आस्थापने बंद आहेत. या बंदला एमआयडीसीमधील कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

गर्दी हटविण्यासाठी 15 पथके
आज रविवारी होत असलेल्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात बंदोबस्ताची संपूर्ण तयारी झाली आहे. शहरात पोलिसांचे 15 पथके कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली. मिटके म्हणाले, शहरात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गस्त सुरू आहे. शांतता भंगचे गुन्हे नोंदविले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत 135 पेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 35 पेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या सर्व गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गुन्हे न दाखल करण्याची वेळ आणावी. हे सर्व तुमच्या आरोग्यासाठीच चालू आहे. सहकार्य करावे. रस्ते मोकळे असल्याने दुचाकी किंवा त्यांच्याकडील वाहन मर्यादित वेगात चालविण्याचा आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा बँकेतही दक्षता
जिल्हा बँकेच्या शाखा कार्यालयात दररोज संपूर्ण स्वच्छता, कर्मचारी, अधिकारी यांची हाताची नियमित स्वच्छता, मास्क कंपलसरी, ग्राहकांना तात्काळ सेवा देत, गर्दी होणार नाही याची दक्षता, एसएसएम सुविधेवर भर, आजार कर्मचार्‍यांना सुट्टी, ग्राहकांनी किरकोळ कामासाठी बँकेत येणे टाळावेत, महत्वाच्या कामाशिवाय नातेवाईकांना बँकेत आणू नका, शक्यतो 31 मार्चपर्यंत बँकेत जाणे टाळावे, बँकेच्या आवारात थुंकण्यास बंदी, बँकेत तिन फुट अंतर ठेवण्याचा नियम पाळावेत, आदी सुचना जिल्हा बँकेच्यावतीने ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.

शनिवारचे निगेटिव्ह 25
एकूण निगेटिव्ह 147
देखरेखीखाली 49
अहवालाची प्रतीक्षा 48
आतापर्यंत तपासणी 197

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!