Friday, April 26, 2024
Homeनगरलोणीतील एक जण पॉझिटीव्ह; त्याच्या संपर्कातील २४ संशयित साई आश्रम येथील विलगीकरण...

लोणीतील एक जण पॉझिटीव्ह; त्याच्या संपर्कातील २४ संशयित साई आश्रम येथील विलगीकरण कक्षात

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली असून राहाता तालुक्यातून शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 25 जणांपैकी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कातील 24 जणांना पुढील चौदा दिवसांसाठी साईबाबा संस्थानच्या निमगाव येथील साईआश्रम फेज 2 मध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

राहाता तालुक्यातून आतापर्यंत सुमारे 5 हजार 96 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 2 हजार 84 जणांना होम कोरोंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान मागील दोन दिवसात तालुक्यातील 25 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये एकजण पॉझिटीव्ह आला असल्याने त्याच्या संपर्कातील 35 जणांना तातडीने नगरला पाठविण्यात आले.

- Advertisement -

त्यानंतर आणखी 6 लोकांना तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याने होम क्वारंटाईन व्यक्तींचा एकूण आकडेवारी 66 झाली आहे. यातील लोणी येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील 24 जणांना पुढील चौदा दिवसासाठी प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या साईबाबा संस्थानच्या निमगाव हद्दीतील साई आश्रम फेज 2 येथे ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी एकूण शंभर व्यक्तींसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

येथील आठ रूममध्ये प्रत्येकी आठ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान एका व्यक्तीस जिवनावश्यक वस्तुंचे स्वतंत्र किट देण्यात आले आहे. मात्र या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना केली आहे का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

या लोकांवर शासनाच्यावतीने नियुक्त केलेल्या डॉक्टरांचे पथक निगराणी ठेवणार असून साईसंस्थानच्यावतीने दोन वेळचे जेवण बंद पाकीटातून तसेच चहापाणी विलगीकरण कक्षाबाहेर नेमण्यात आलेल्या व्यक्तीकडे सोपविण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या