Thursday, April 25, 2024
Homeनगरकोरोनामुळे मजूर टंचाई; हार्वेस्टर धारकांकडून शेतकर्‍यांची लूट

कोरोनामुळे मजूर टंचाई; हार्वेस्टर धारकांकडून शेतकर्‍यांची लूट

दर दोन दिवसांला वाढवताहेत भाव; गहू उत्पादक वेठीस

नेवासा (तालुका वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना गहू काढणीला कोरोनाच्या भीतीमुळे मजूर मिळेनासे झाले असून त्यामुळे हार्वेस्टर यंत्राशिवाय पर्याय राहिलेला नाही. हार्वेस्टरधारकांनी याचा फायदा उठवत मनमानी सुरु केली असून दोन-दोन दिवसाला भाव वाढवून शेतकर्‍यांची लूट करण्याचा सपपाटला लावला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात चिड व्यक्त होत आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे शेतमजुर शेतात काम करण्यास यायला तयार नाहीत. गहू सोंगणीसाठी अधिक मजुरी देवूनही मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे हार्वेस्टर हाच एकमेव पर्याय असल्याने शेतकरी हार्वेस्टरधारकांकडे चकरा मारत आहेत. मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध झाल्याने त्याचा फायदा उठवत हार्वेस्टर धारक हार्वेस्टींगचे दर दिवसागनिक वाढवत आहेत. सध्या गहू काढणीला शेतकर्‍यांना एकरी अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत.

तरी देखील हार्वेस्टरची प्रतिक्षा करावी लागत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाच्या भीतीमुळेच शेतात मजूर मिळत नाही. शेतामध्ये कांदा काढणी, गहू सोंगणी, हरभरा काढणी आदी कामे होत आहे. शेतातील विविध कामांसाठी महिलांना दोनशे रुपये रोजंदारी मोजावी लागत आहे. गहू काढणीला वेळ लागतो. त्यामुळे शेतकरी हार्वेस्टरने गहू काढणीला प्राधान्य देत आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी एकरी गहू काढणीला 1700 रूपये भाव होता. गेल्या आठवड्यात हाच भाव वाढवून दोन हजार करण्यात आला. आता तर एकरी अडीच हजार रुपये गहू काढणीसाठी शेतकर्‍यांना द्यावे लागत आहेत. हार्वेस्टर चालकांची मनमानीपणाने भाव वाढत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावेळी बाहेरील राज्यातून हार्वेस्टर आलेले नाही. आले तरी येथील हार्वेस्टर चालक दमदाटी करतात.

आपल्या भागात येण्यास मज्जाव करतात. काही ठराविक हार्वेस्टर त्यांना दादागिरी करीत असल्याचे शेतकरी सांगतात. बाहेरील हार्वेस्टर आले नाही की येथील हार्वेस्टर मनाला येथील तो भाव करून शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे काम सुरुआहे. शेतकर्‍यांना गरज असल्याकारणाने गहू काढणीसाठी शेतकरी दिवसभर उन्हातान्हात हार्वेस्टर मागे नंबर येण्यासाठी फिरत असतो.

छोट्या शेतकर्‍यांची एकर, दोन, अर्धा एकर गहू काढणी असते. झटपट गहू काढणीसाठी तो हार्वेस्टरच्या मागे फिरताना दिसत आहे. शेतातील गहू काढल्यानंतर हार्वेस्टर चालक हवा तो भाव मागत असल्याने शाब्दिक वादावादी होण्याचे प्रकार होत आहेत. हार्वेस्टर चालकांची मुजोरी वाढली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

प्रशासनाची यंत्रणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंतलेली असल्याने हार्वेस्टर त्याचा फायदा घेवून शेतकर्‍यांची अडवणूक करीत आहेत. आरटीओ अधिकारी वर्गाने सध्या तालुक्यात हार्वेस्टर चालकांकडून होत असलेल्या लुटीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या हार्वेस्टर मशिनला परवाना कसा? किती दिवसांसाठी आहे. याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

मनमानी भाववाढीला लगाम हवा
तालुक्यात बाहेरील हार्वेस्टर आले की येथील हार्वेस्टर चालक योग्य भाव घेतात. हार्वेस्टरची संख्या वाढली तर शेतकर्‍यांना योग्य भावात व हवे तेव्हा झटपट हार्वेस्टर मिळतात. पंरतु यावेळी बाहेरील हार्वेस्टर आली नाही त्यामुळे स्थानिक हार्वेस्टर धारकांची बेशिस्त वाढली आणि वाढीव भाव केला. याला लगाम घातला पाहिजे.
– बाबासाहेब खराडे, शेतकरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या