करोनामुळे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला कोलदांडा

शेतकर्‍यांवर संकटांचा डोंगर ; देवळालीत कर्जमाफीची प्रतिक्षा

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या दुसर्‍या टप्प्यातील 1 हजार 800 शेतकर्‍यांपैकी निम्म्यापेक्षा कमी शेतकर्‍यांची नावे आल्याने कर्जदार शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात देवळाली सोसायटी अठरा व राहुरी स्टेट बँकेत फक्त सात लोकांची यादी आली आहे. करोनामुळे कर्जमाफीला कोलदांडा बसला आहे. पर्यायी आधीच संकटात असलेला शेतकरी आणखी संकटाच्या दरीत ओढला गेला आहे.

दोन लाखापर्यंत पीककर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना महाआघाडी सरकारने सरसकट कर्जमाफी दिली. यामध्ये पहिल्या यादीत तालुक्यातील 17 हजारापेक्षा अधिक शेतकर्‍यांची नावे आली. त्यांच्या पीककर्ज खाती रक्कम जमा करण्यात आली. परंतु हे होत असताना 1 हजार 800 शेतकर्‍यांची यादी मागे राहिली होती. ती यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल व उर्वरित सर्व शेतकर्‍यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे शासकीय अधिकारी सांगत होते. पुढे 21 मार्चपासून राज्यात करोनाचे संकट येऊन ठेपले व देशासह राज्य लाकडाऊन करण्यात आले.

42 दिवसाच्या लाकडाऊननंतर शासनाने यामध्ये थोडीशी शिथिलता करून तोंडावर आलेला पावसाळा व खरीप हंगाम लक्षात घेऊन दुसरी यादी पाठविली. परंतु या यादीत मूठभर लोकांची नावे आल्याने उर्वरित शेतकरी मात्र, हवालदिल झाले आहेत. वास्तविक पाहाता शासनाने दुसर्‍या यादीत उर्वरित शेतकर्‍यांची नावे तातडीने पाठविणे गरजेचे होते. मे महिन्याचा दुसरा आठवडा संपण्याच्या मार्गावर आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पावसाळा वेळेवर व समाधानकारक आहे. म्हणून पुढील पीक घेण्यासाठी आत्ताच शेतीची मशागत होणे जरूरीचे आहे. जून महिन्यात पेरणीला प्रारंभ होत असल्याने याच महिन्यात बी-बियाणे, खते आदींची शेतकरी तयारी करत असतो. परंतु कर्जमाफी न मिळाल्याने खाते थकबाकीत आहे. खाते थकबाकीत असल्याने बँक नवीन कर्ज द्यायला तयार नाही.

आधीचा भिषण दुष्काळ, त्यानंतरची अतिवृष्टी व आता करोना या तिहेरी संकटात बळीराजा मात्र, घाण्यात घातल्या सारखा पिसून निघत आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन त्वरीत नवीन पीककर्ज दिले तर ऊस शेतीला त्याचा मोठ्या प्रमाणात आधार होईल, अन्यथा ऊस शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. ऊस शेती उद्ध्वस्त झाली तर या भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. पर्यायी बागायती पट्ट्यात देखील शेतकरी आत्महत्या होतील.

दुसर्‍या यादीर केवळ सात नावे
राहुरी स्टेट बँकेत पीक कर्ज घेणारे सुमारे 560 थकीत कर्जदार आहेत. त्यापैकी पहिल्या यादीत सुमारे 65 लोकांची नावे आली. त्यानंतर करोनामुळे हे काम थांबले. आता पुन्हा दुसरी यादी आली त्यात फक्त सात लोकांची नावे असून उर्वरित लोकांची नावे आलेली नाहीत. मग ही नावे येणार कधी? कर्जमाफी मिळणार कधी? नवीन कर्ज मिळणार कधी? नवीन पीक करायचे कधी ? हा शेतकर्‍यांचा सवाल आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी कर्जदार शेतकर्‍यांनी केली आहे. अन्यथा रब्बी तर गेलाच पण खरीप देखील जाण्याची शक्यता दिसत असल्याने ‘तेलही गेलं अनं तूपही गेलं…’ अशी परिस्थिती व्हायला नको !