Friday, April 26, 2024
Homeनगरनगरचे ‘ते’ चौघे ‘कोरोना’ मुक्त; जिल्हाधिकार्‍यांची माहिती

नगरचे ‘ते’ चौघे ‘कोरोना’ मुक्त; जिल्हाधिकार्‍यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- परदेशातून आलेल्या नगरमधील पाच प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांची चाचणी देखील करण्यात आलेली नाही. केवळ खबरदारी म्हणून त्यांना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार निगराणीखाली ठेवले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे कोरोनाबाबत अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

कोरोना विषाणूबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. केवळ खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले. 1 मार्च रोजी दुबईवरून जे चार नगरकर आले होते, ते एकाच कुटुंबातील आहेत. त्यांची तपासणी करण्याचे शासनाचे निर्देश होते.

- Advertisement -

त्याप्रमाणे आरोग्य विभागाने तपासणी केली असता, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना त्यांच्या घरीच आरोग्य पथकाच्या निगरानीखाली ठेवले आहे. कोरोनाचा प्रभाव 14 दिवसांत दिसतो. मात्र, दुबईवरून आलेल्या या नागरिकांना येऊन 11 दिवस झालेले आहेत. त्यांना कोणताच त्रास झालेला नसून तसेच 13 दिवसांपूर्वी इटलीहून केडगाव येथील तरूण आला होता. त्यालाही लक्षणे नाहीत. यामुळे या पाचही जणांना केवळ निगरानी खाली ठेवण्यात आलेले आहे.

हे पाच नागरिक हे त्यांच्या घरात राहत असून त्यांनी 14 दिवस कोणाच्याही संपर्कात येवू नयेत, अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. आणखी दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यावरील निगरानी काढून घेतली जाईल. दुबईहून आलेल्या कुटुंबातील दोन मुले नंतर शाळेत गेली होती. खबरदारी म्हणून त्या शाळेतील मुलांचीही तपासणी केली आहे. सुदैवाने सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप एकही रूग्ण नाही, हे स्पष्ट झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली.

चार ठिकाणी कक्ष
कोरोनाबाबत खबरदारी म्हणून जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना प्रतिबंधक कक्ष तयार करण्यात आलेले नाहीत. त्यात जिल्हा रूग्णालयात 10 बेड, बूथ हॉस्पिटल 60 बेड, साई संस्थानच्या रूग्णालयात 15, तर शनिशिंगणापूर संस्थानच्या हॉस्पिटमध्ये 10 बेडची व्यवस्था आहे. काही आपतकालीन स्थिती उद्भवली तर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने ही तयारी केल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिकारी नियुक्त
जिल्ह्यात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपत्कालीन परिस्थिती असल्यास त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानूसार वेगवेळ्या अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

झेडपीची इस्त्रो सहल रद्द
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू महिन्यांत केरळला जाणारी इस्त्रो सहल रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याासह जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि शिक्षण विभागाच्या राज्याबाहेर जाणार्‍या सर्व सहली रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

अधिवेशन गुंडाळणार
मुंबई-कोरोना व्हायरसने पुण्यापाठोपाठ आता मुंबईत एन्ट्री केली आहे. मुंबईत कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंढाळण्यात येणार आहे. 14 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप करण्यात येणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच राज्यात कुठल्याही प्रकारचा मोठा समारंभ होणार नाही, असाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई
कोरोनाबाबत चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरवली तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. तशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. यामुळे चुकीची माहिती पसविणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिला.

मढी यात्रेबाबत चौकशी करून निर्णय
येत्या रंगपंचमीला पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी दरवर्षी भव्य यात्रा भरत असते. त्याठिकाणी राज्याच्या कानाकोपर्‍यासह काही वेळा परदेशातून भाविक दर्शनासाठी येतात. राज्यातील अन्य यात्रांप्रमाणे मढीच्या यात्रेवर बंदी घालणार का? याबाबत विचारणा केली असता, यासंदर्भात चौकशी करून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या