Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर, नेवासा, वांबोरीत करोना रूग्ण; निमोणच्या व्यक्तीचा मृत्यू

श्रीरामपूर, नेवासा, वांबोरीत करोना रूग्ण; निमोणच्या व्यक्तीचा मृत्यू

तिघे मुंबईकर करोना पॉझिटिव्ह

सिध्दटेकमध्येही रूग्ण, बाधितांचा आकडा 75

अहमदनगर (प्रतिनिधी)- बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या तिघा, तर श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील एकाला अशा चौघांना करोनाची बाधा झाल्याचे रविवारी सकाळी समोर आले. श्रीरामपूरच्या बाधितामुळे आता जिल्ह्यातील करोनाग्रस्तांचा आकडा 75 वर पोहचला आहे. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका बाधित व्यक्तीवर नाशिकमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

रविवारी करोनाग्रस्त सापडलेल्या व्यक्तीमध्ये तिघे मुंबई, उल्हासनगर, तुर्भे या ठिकाणाहून नगर जिल्ह्यात आले होते. तर संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका व्यक्तीचा शनिवारी रात्री नाशिक येथे मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 7 झाली आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या 75 असून जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या सात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी रात्री उशीरा ते रविवारी सकाळपर्यंतचे 19 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. यात एक 26 वर्षीय व्यक्ती 17 मे रोजी मुंबईहून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आली होती. दुसरी 60 वर्षीय बाधीतव्यक्ती तुर्भे, मुंबई येथून 22 मे रोजी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आली होती. नेवासा बुद्रक येथे 22 मे रोजी उल्हासनगर येथून आलेल्या 60 वर्षीय महिलाही बाधीत आढळून आली आहे. याशिवाय, काही दिवसापूर्वी बाधीत आढळलेल्या घाटकोपर येथील महिलेचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासह श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 75 झाला आहे.

दरम्यान, नाशिक येथे उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला.नाशिक येथे कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे ते वडील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

राहुरी तालुक्यातील पहिला बाधित वांबोरीत सापडला

कल्याणवरून घेऊन आला करोना

उंबरे (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री दहा वाजता वांबोरी जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करून ठेवलेल्या या रुग्णाला ताप आल्याने त्याला नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल सकाळी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली. दरम्यान, करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नलीनी विखे यांनी वांबोरी धाव घेतली आणि पुढील नियोजन केले.

गेल्या दोन महिन्यांपासून राहुरी तालुका करोनापासून वाचून होता. मात्र, मुळचा वांबोरी येथील व्यक्त आणि गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत कल्याणमध्ये कामांधद्यानिमित्त असणारा 26 वर्षीय तरूण 17 तारखेला वांबोरीत दाखल झाला. गावात आल्यानंतर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करण्यात आले होते. या तरूणाला दोन दिवसांपूर्वी ताप आणि घसा दुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याचा स्त्राव घेऊन तपासणी केली असता त्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, बाधीत व्यक्ती सोबत आणखी एकजण मुंबईहून वांबोरीत आलेला असून त्याला देखील क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. कल्याणचा व्यक्ती बाधित असल्याचे समोर आल्यानंतर त्याचा सोबत मुंबईहून आलेला व्यक्ती आणि त्याचा वांबोरी गावातील भाऊ असे दोघे बाधिताच्या हायरिस्क संपर्कात असल्याचे समोर आले आहे. यामुळे या दोघांना प्रशासनाने नगरला जिल्हा रुग्णालयात स्त्राव तपासणीसाठी रविवारी दुपारच पाठविले आहे.

ग्रामपंचायतमध्ये बैठक
वांबोरी करोना बाधित रुग्ण असल्याचे समजताचे तहसीलदार शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विखे आणि अन्य शासकीय अधिकार्‍यांनी वांबोरी ग्रामपंचायतीमध्ये धाव घेत पुढील नियोजनाची बैठक घेतली. यावेळी राहुरी कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, भानुदास कुसमुडे यांच्या अन्य उपस्थित होते. यावेळी पुढील दक्षता घेण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या हायरिस्कसह अन्य व्यक्तीचे स्त्राव नमुने घेण्याची मागणी करण्यात आली. तर शाळेत क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना झोपण्यासाठी बेड उपलब्ध करून देण्याची मागणी भिटे यांनी केली.

त्या दोघांच्या अहवालावर बरेच अवलंबून
करोना बाधित सापडलेल्या त्या व्यक्तीच्या संपर्कात वांबोरीतील दोघे आलेले आहेत. यात एक हा मुंबईहूनच सोबत आलेला आहे. तर दुसरा त्याचा भाऊ आहे. बाधित व्यक्ती आणि आपल्या सख्या भावाला त्याने दुचाकीवरून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून वांबोरीला आणले होते. यामुळे हे दोघे भाऊ हे बाधिताच्या हायरिस्कमध्ये आहेत. या दोघांचे स्त्राव नमुने घेतले असून त्याचा अहवालावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

वांबोरी टेन्शनमध्ये
वांबोरी हे मोठे लोकसंख्या असणारे गाव आहे. या ठिकाणी दोन शाळांमध्ये 20 लोक क्वारंटाईन करून ठेवलेले आहे. बाधित व्यक्ती ही जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन होती. या ठिकाणी असणार्‍या उर्वरित 9 क्वरांटाईन व्यक्तीची दिवसांतून तीनवेळा वेगवेगळी आरोग्य तापसणी करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विखे यांनी सांगितले. मात्र, वांबोरीत करोनाचा शिरकाव झाल्याने संपूर्ण गाव तणावाखाली आहे. बाधित व्यक्ती आणि त्याचा जवळचा नातेवाईक हा गावातील अनेकांच्या संपर्कात आलेला असल्याने सर्वाचे धाबे दणाणले आहे.

नेवासा : कल्याणवरून आलेल्या महिलेला बाधा

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- नेवासा तालुक्यात दीड महिन्यानंतर करोनाचा नवीन रुग्ण आढळला असून कल्याण येथून आलेल्या 60 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

कल्याण येथून 20 मे रोजी सदर महिला नेवासा बुद्रुक येथे आल्यानंतर तिला जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. 22 मे रोजी त्रास होऊ लागल्याने प्राथमिक तपासणी करून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी आलेल्या अहवालातून ती करोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी आरोग्य विभागाने सुरू केली असून त्यातील हायरिस्क व लो रिस्क असे वर्गीकरण करून हायरिस्क संपर्कातील व्यक्तींना स्त्राव तापसणीसाठी पाठवणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान नेवासा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत जाऊन तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोहसीन बागवान, डॉ. रवींद्र कानडे, आरोग्य सेवक शंकर मालदोडे व ग्रामस्तरीय दक्षता समिती सदस्यांनी पाहणी करून सूचना केल्या.

ग्रामस्तरीय समित्यांनी सतर्क रहावे
18 एप्रिल नंतर नेवासा तालुक्यात एकही करोनाबाधीत रुग्ण आढळला नसताना काल एक रुग्ण करोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील ग्रामस्तरीय दक्षता समित्यांनी अधिक सतर्क राहून बाहेरील व्यक्तींना क्वारंटाईन करावे.

– रुपेश सुराणा तहसीलदार

संपर्कातील एका व्यक्तीचा पलायनाचा प्रयत्न
या महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध प्रशासनाने सुरू केला असता त्याचवेळी महिलेच्या संपर्कातील एका व्यक्तीने घरातून धूम ठोकली. सदर व्यक्ती गावातील स्मशानभूमीकडे पळाला. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे, कॉन्स्टेबल प्रताप दहिफळे, श्री. बर्डे, पोलीस मित्र संतोष गायकवाड यांनी त्याला पाठलाग करून पकडले व तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. तसेच संपर्कातील इतर व्यक्तींना स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.  

औरंगाबादला गेलेल्या वडाळ्याच्या तरुणाला करोना

वडाळा महादेव (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील एका आध्यात्मिक केंद्रात एक 32 वर्षीय करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने श्रीरामपूर तालुका तसेच परिसरात प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

वडाळा महादेव येथील आध्यात्मिक पंथातील गृहस्थ हे औरंगाबाद येथे धर्मप्रचार व प्रसारासाठी वास्तव्यास होते. औरंगाबाद येथे करोना संसर्ग आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने सदर गृहस्थाने धार्मिक भावनेतून तसेच पंथाच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी सदर गृहस्थ यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी वडाळा महादेव येथे येण्याचे ठरविले.

त्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी येथे आणण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने श्रीरामपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन ते तीन दिवस येथे उपचार करण्यात आले तरी प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने वैद्यकीय सूत्रांकडून त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर विविध तपासण्या करण्यात आल्या, त्यानुसार त्यांना करोना आजाराचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

याबाबत वैद्यकीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. सदर गृहस्थ हे वडाळा महादेव नेवासा रोडवर आध्यात्मिक केंद्रात राहत होते. घटनेची माहिती तात्काळ तालुक्यात तसेच परिसरात समजल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका व आशा कर्मचारी यांनी तात्काळ धाव घेत सदर प्रकार तालुका वैद्यकीय अधिकारी व येथील सरपंच अरुंधती पवार यांना सांगितला. त्यानुसार येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश पवार यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत प्रशासनाकडून तात्काळ जोरदार हालचाली सुरू झाल्या.

येथील आश्रमास प्रशासकीय अधिकार्‍यांनी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान, सरपंच अरुंधती पवार, ग्रामपंचायत सदस्य तसेच करोना कमेटी उपस्थित होती. सत्गृहस्थ यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

तसेच वडाळा महादेव येथील काही ग्रामस्थ सदर गृहस्थांच्या संपर्कात होते त्यांचीही माहिती घेण्यात आली. यापुढे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस, प्रशासकिय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्याकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ, करोना कमिटी सदस्य उपस्थित होते.

डॉक्टर निगराणीखाली
वडाळा महादेव येथील करोना रुग्णाने श्रीरामपुरातील एका डॉक्टरकडे दोन दिवस उपचार घेतले होते. या डॉक्टरांनी आणि नर्स यांनी पीपीई किट वापरल्याने त्यांना केवळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांना तपासणीसाठी नगरला हलविण्यात आले आहे.

बेलापूरच्या मंदिरातही घेतले दर्शन
वडाळा महादेव येथील करोना रुग्णाने बेलापूर येथील एका धार्मिक केंद्रात दर्शन घेतले. त्यापूर्वी त्यांनी येथील एका दुकानातून धार्मिक साहित्य खरेदी केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या