Thursday, April 25, 2024
Homeनगरकॉपी करू न दिल्याच्या रागातून पालकाची पोलिसांवर दगडफेक

कॉपी करू न दिल्याच्या रागातून पालकाची पोलिसांवर दगडफेक

पोलीस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की; ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालय परीक्षा केंद्रावरील प्रकार

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेत मुलीस कॉपी करू न दिल्याचा राग आल्याने एका पालकाने परीक्षा केंदावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्सटेबलच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की करण्याची घटना तालुक्यातील ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालयातील परीक्षा केंद्रावर काल दि. 20 रोजी घडली. पोलिसांनी संबंधिताविरुध्द सरकारी कामात अडथळा तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

पोलीस कॉन्सटेबल राहुल रावसाहेब खंडागळे यांनी बबन सुखदेव सांगळे (वय 43 वर्षे, राहणार महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा ) याच्या विरुद्ध फ़िर्याद दिली आहे. काल मराठी विषयाचा पेपर होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुलीला कॉपी देण्यास विरोध केल्याने आरोपीने खंडागळे यांच्या अंगावर जाऊन कॉलर पकडून धक्काबुक्की केली. फिर्यादी व साक्षीदार पो. कॉ. सुखदेव धोत्रे यांच्यावर दगडफेक केली. फिर्यादीच्या बोटावर जखम होऊन पायाला मुका मार लागला आहे.

शासकीय कामात अडथळा आणला, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले तसेच विद्यापीठाच्या व मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे संबंधित आऱोपी देशसेवेचे कर्तव्य बजावणार्‍या खात्यात कार्यरत असल्याची चर्चा आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.

संबंधिताविरुध्द गुन्हा दाखल होऊ नये यासाठी अनेक मध्यस्थांनी प्रयत्न केले; मात्र पोलिसांनी दुर्लक्ष करत गुन्हा दाखल केल्याने अशा प्रवृत्तींना आळा बसण्यास हातभार लागणार आहे. 12 वी परीक्षा घेताना संबंधित केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांवर किती मानसिक ताणतणाव राहत असेल याचा कोणी विचार करत नाही. यंत्रणेने परीक्षा पध्दतीत अभ्यासपूर्वक व योग्य तो बदल करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा पोलिसांवर हात उगरणार्‍या वृत्ती शिक्षकांना किती व कसा त्रास देतील हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ मंडळी नामानिराळी राहून, प्रसंगी दुर्लक्ष करुन काही असे प्रकार घडले तर त्याचे खापर कनिष्ठांवर फोडण्यात धन्यता मानतात.

तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांच्या बाहेर जमाव करू नये. परीक्षार्थींना कॉपी देण्याच्या फंदात पडू नये. परीक्षाकेंद्रात घुसण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा पोलीस कोणाच्याही दबावाला बळी न पडता संबंधिताविरुध्द कायदेशीर कारवाई करतील.
-रामराव ढिकले – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शेवगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या