Type to search

Featured नाशिक

गंगापूर डॅम आणि घोटी-सिन्नर मार्गावर लुटमार करणार्‍या दोन टोळ्या जेरबंद

Share

नाशिक । प्रतिनिधी

गंगापूर डॅम परिसरात प्रेमी युगुलांना तसेच घोटी-सिन्नर मार्गावर प्रवाशांना आडवून लूटमार करणार्‍या दोन टोळ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सुनील सोमनाथ वाडगे (21), गणेश रूंजा गुंबाडे (20, दोन्ही रा. पिंपळगाव गरूडेश्वर, ता. जि. नाशिक) व राजू रंगास्वामी भोजया( 21,रा. आनंदरोड, देवळाली कॅम्प), रोहित किसन कुसमाडे (19, रा. चारणवाडी, देवळाली कॅम्प), शिवा संजय मोरे (19, रा. राजवाडा, संसारीगाव, ता. जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

जिल्ह्यातील लुटमारीच्या गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी जिल्हा शहर व आंतर जिल्ह्यातील गुन्हेगारांचा सध्याचा ठावठिकाणा व त्यांची गुन्हा करण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर पोलीस ठाणे व नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले जबरी चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता. या दरम्यान गुरुवारी (दि. 31) पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गंगापूर डॅम परिसरात पर्यटकांची लूटमार करणारे संशयित हे पिंपळगाव गरूडेश्वर शिवारातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पिंपळगाव गरूडेश्वर परिसरात सापळा रचून संशयित सुनील सोमनाथ वाडगे, गणेश रूंजा गुंबाडे यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक व्हीवो व्ही 9 कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला आहे.

या बाबत संशयितांना पोलिसी खाक्या दाखवून चौकशी करताच त्यांनी गेल्या महिन्यात गंगापूर डॅम व सुला वाईन परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली होण्डा शाईन मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयितांनी गंगापूर डॅम परिसरात जबरी लुटमारीचे अजून काही गुन्हे केल्याची शक्यता असून पुढील तपास चालू आहे.

सिन्नर पोलीस ठाण्यात अमोल केदार, रा. पांढुर्ली, ता.सिन्नर यांची होंडा शाईन मोटर सायकल व मोबाईल फोन असा मुद्देमाल अज्ञात आरोपीतांनी घोरवड घाट परिसरातून चाकूचा धाक दाखवून चोरून नेला होता. या मध्ये देवळाली कॅम्प परिसरातील तिघांचा समावेश असल्याचे समोर आल्याने राजू रंगास्वामी भोर्‍या, रोहित किसन कुसमाडे, शिवा संजय मोरे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार सुरेश मंजुळे, आकाश गायखे, परशुराम देवकर अशांनी मिळून लूट केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या कडूनही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!