Friday, April 26, 2024
Homeनगरकंत्राटी कामगारांचे आजपासून ठिय्या आंदोलन

कंत्राटी कामगारांचे आजपासून ठिय्या आंदोलन

कामगार संघटनेसह ग्रामस्थांचा पाठिंबा; व्यवस्थापनाच्या भूमीकेकडे लक्ष

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील चितळी येथे मद्य निर्मिती करणार्‍या जॉन डिस्टिलरी कंपनीने आपले 50 कंत्राटी कामगारांना कालपासून कामावरून कमी केले. या पार्श्वभूमीवर सदरचे कंत्राटी कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी कंपनीच्या गेटसमोर बसून ठिय्या आंदोलन सुरूकरणार आहेत.

- Advertisement -

जॉन डिस्टिलरीमध्ये 128 कामगार काम करीत होते. त्यामध्ये 36 कामगार कायम असून 42 तांत्रिक कामगार आहेत. मात्र कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या 50 कामगारांवर अचानक नोकरीवरुन काढून टाकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तांत्रिक कामगारांचा अपवाद वगळता इतर कामगारांपैकी मोठ्या प्रमाणावरील कामगार हे स्थानिक शेतकरी, शेतमजुरांची मुले आहेत.

जॉन डिस्टिलरीच्या स्पेंटवॉशमुळे परिसरातील शेती नापीक झाली. विहिरीतील पिण्याचे पाणी दूषित झाले. त्यामुळे स्थानिक मुलांना नोकरीची संधी देऊन या प्रदूषणग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जॉन डिस्टिलरीचे उत्पादन सध्या मोलासेसच्या (मळी) तुटवड्यामुळे बंद आहे. परंतु ही परिस्थिती कायमस्वरुपी राहणार नसल्याने यामध्ये सामोपचाराने तोडगा काढावा, अशी स्थानिक ग्रामस्थांसह कामगार संघटनेची भूमिका आहे.

दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने केवळ हटवादी भूमिका घेऊन त्यामध्ये कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे कामगारांना आपल्या नोकरीसाठी सनदशीर आंदोलनाच्या मार्गाने जाणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यामुळे जॉन डिस्टिलरीचे 50 कंत्राटी कामगार आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. दरम्यान, या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र चितळी परिसरात पाहायला मिळत आहे.

कामगार आंदोलनास सर्वपक्षीय पाठिंबा
जॉन डिस्टिलरीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणारे सर्व कामगार चितळी पंचक्रोशीतील आहेत. परिसरातील कामगारांना तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकणे गैर आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व संघटनेचा कामगार आंदोलनास पाठिंबा असल्याची भावना त्यांनी कळविली आहे.

मिळेल ते काम करणार : गायकवाड
मोलासेसच्या तुटवड्यामुळे जॉन डिस्टिलरी प्रकल्प सध्या बंद आहे. कंपनी व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांचे काम बंद केले हे खरे. परंतु कायम कामगारांना इतरत्र काम करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. आम्ही मिळेल ते काम करणार असल्याचा खुलासा पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी केला आहे. तोडगा काढावा, अशी स्थानिक ग्रामस्थांसह कामगार संघटनेची भूमिका आहे.

तांत्रिक कामगारांचा पाठिंबा : वाघ
कंपनीने कायम व तांत्रिक कामगारांना कामावर ठेवून कंत्राटी कामगारांना तूर्त कामावरून कमी केले आहे. अचानक काम बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून तांत्रिक कामगारांचा कंत्राटी कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचा खुलासा श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष विकास वाघ यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या