Saturday, April 27, 2024
Homeनगरग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला राजाचा दर्जा मिळाला

ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला राजाचा दर्जा मिळाला

शिर्डीत राष्ट्रीय ग्राहक दिन

शिर्डी (प्रतिनिधी) – ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला राजाचा दर्जा मिळाला आणि त्याच्या हक्काचे संरक्षण करण्यात आले आहे. नागरिकांनी या कायद्याने मिळालेल्या अधिकारांची माहिती करुन घेतल्यास फसवणूक होणार नाही, असे प्रतिपादन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी आज केले.

- Advertisement -

दरवर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर तसेच तहसील कार्यालय, राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी गोविंद शिंदे बोलत होते. पंचायत समिती सभापती हिराताई कातोरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहायक पुरवठा अधिकारी सुनील सैंदाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, कृषी सभापती रायभान आहेर व ग्राहक संरक्षण सल्लागार समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक नागरिक हा प्रथम ग्राहक असून ग्राहक जागृती होण्याच्या दृष्टीने हक्क व कर्तव्याची जाणीव ग्राहकास होऊन ग्राहक हा सुजाण व्हावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आलेला आहे, असे सांगून शासनातर्फे देण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या सेवा विनाविलंब व चांगल्या प्रकारे देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले. 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायदा अंमलात आला. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.

गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, विद्यार्थी व ग्राहक संरक्षणासाठी कार्य करणार्‍या सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्राहक दिनानिमित्त शासनाच्या विविध विभागांच्या वतीने नागरिकांना देण्यात येणार्‍या लोककल्याणकारी सेवासुविधांची माहिती देणार्‍या प्रदर्शनाचे आयोजन तहसील कार्यालय परिसरात करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घटन सभापती हिराताई कातोरे आणि प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती आरोग्य विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, महा-ई-सेवा, हिंदुस्थान पेट्रोलियम आदी आस्थापनांचे स्टॉल प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या