Saturday, April 27, 2024
Homeनगरअनुकंपाधारकांना अखेर जिल्हा परिषदेत नियुक्त्या

अनुकंपाधारकांना अखेर जिल्हा परिषदेत नियुक्त्या

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी काढले आदेश : 20 एप्रिलपर्यंत रूजू करणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- दीड महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या पात्र अनुकंपाधारकांच्या नेमणुका रखडल्या होत्या. या नेमणुकांना गुरूवारी मुहूर्त लाभला असून मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी 45 अनुकंपाधारकांना जिल्हा परिषद सेवेत विविध पदावर नियुक्ती दिल्या आहेत. नियुक्त केलेल्या सर्व अनुकंपाधारकांना 20 एप्रिलपर्यंत कामावर रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.
कोरोना विषाणुचा संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असतांनाही गेल्या आठवड्यात सातारा जिल्हा परिषदेने इमेलद्वारे अनुकंपाच्या नियुक्त्या दिल्या होत्या.

- Advertisement -

याच धर्तीवर नगर जिल्ह्यातही नियुक्त्या देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांसह अनुकंपाधारक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. साधारण दीड महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेने अनुकंपाधारक उमेदवारांना जिल्हा परिषदेत बोलावून त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली होती. त्यानंतर निवडक एक-दोन जणांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यानंतर लगेच कोरोना विषाणूचा प्रकोप झाल्याने अनुकंपाचा विषय मागेच राहिला. नुकतेच सातारा जिल्हा परिषदेकडून लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता 54 अनुकंपाधारकांना ई-मेलद्वारे नियुक्ती देण्यात आली. नगर जिल्ह्यात 130 अनुकंपा धारकांपैकी 45 जण नियुक्तीसाठी पात्र होते.

लॉकडाऊनमुळे अनुकंपाधारकांची परिस्थिती गंभीर झाली होती. या शिवाय नेमणुका लांबल्यास पात्र उमेदवरांच्या वयाचा तांत्रिक प्रश्न निर्माण होणार होता. यामुळे या उमेदवारांना तातडीने नेमणुका देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी गुरूवारी पात्र उमेदवारांना नेमणुकीचे आदेश दिले आहेत. यात 21 आरोग्य सेवक, 14 कनिष्ठ सहायक, सहा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, दोन वरिष्ठ सहायक, एक शिक्षण सेवक व एक पर्यवेक्षिका यांचा समावेश आहे. नियुक्त्या देण्यात आलेल्या उमेदवारांना 20 एप्रिलपर्यंत रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या