Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

स्वच्छतेबाबत प्रतिक्रिया नोंदविण्यास ‘सीएए’, ‘एनआरसी’चा अडथळा

Share
महापालिका अडीच हजार घरांवर लक्ष ठेवणार, Latest News Amc City Home Attention Ahmednagar

महापालिका अधिकारी, कर्मचारी हवालदिल : गैरसमजातून घडतोय प्रकार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेमार्फत सध्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नागरिकांच्या प्रतिक्रिया ऑनलाईन घेण्याचे काम सुरू आहे. अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार्‍या या प्रतिक्रियेत सध्या तरी नगर महापालिका राज्यात सर्वाधिक पुढे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या प्रतिक्रियांचा आकडा सर्वाधिक असणे आवश्यक असला, तरी यास ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ या कायद्यांचा अडथळा निर्माण झाल्याने महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी डोक्याला हात लावला आहे.

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत मागील वर्षी नगरचा क्रमांक तळाला गेला होता. यावर्षी तो किमान 50च्या आत आणण्याचे प्रयत्न महापालिका अधिकार्‍यांचे आहेत. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संदर्भात सर्व महापालिका अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी यांना कामाला लावून शहरात स्वच्छतेची मोहीम राबविली. यात नगरसेवकांसह विविध संस्था, संघटना, महिला आघाड्या, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करून घेत शहरात चकाचक सुरू केली आहे. एकीकडे हे करीत असताना सार्वजनिक शौचालयांचे नूतनीकरण, स्वच्छता याकडेही विशेष लक्ष दिले.

सरकारतर्फे शौचालय, स्वच्छता आणि कचरा व त्यांचे विघटन याचे सर्वेक्षण करण्यात आले. शौचालयाच्या सर्वेक्षणात महापालिकेचे काम समाधानकारक असल्याचा अहवाल असल्याचे समजते. स्वच्छता सर्वेक्षणात विविध टप्पे आहेत. स्वच्छता झाल्यानंतर त्या संदर्भात केलेले काम आणि त्याबाबत नागरिकांचे मत यालाही तेवढेच महत्त्व आहे. यासाठी स्वतंत्र अ‍ॅॅप केले असून, त्यावर हे मत नोंदवायचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक सकारात्मक मते नोंदविण्यात आलेल्या महापालिकेला सर्वाधिक गुण मिळणार आहेत.

सध्यातरी नगर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये चुरस आहे. दुपारपर्यंत चंद्रपूर महापालिकेचे 40 हजार तर नगर महापालिकेच्या 53 हजार प्रतिक्रिया होत्या. असे असले तरी चंद्रपूर शहराची लोकसंख्या नगरपेक्षा कमी असल्याने टक्केवारीत या दोन महापालिकांमध्ये फारसे अंतर नाही. टक्केवारीमध्ये नगर 14 टक्के तर चंद्रपूर 12 टक्के आहे. नगरला थ्री स्टार रँकिंग मिळविण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी हे अंतर जास्तीतजास्त वाढून नगरची टक्केवारी वाढणे आवश्यक आहे.

महापालिकेचे कर्मचारी ठिकठिकाणी प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी नागरिकांशी संपर्क करत आहेत. मुस्लीम बहुल भागात त्यांना याबाबत विचित्र अनुभव येत आहे. सध्या देशात सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. सरकारकडून या कायद्याबाबतच आपले सकारात्मक मत मागविण्यात येत असल्याचा त्यांना संशय आहे. त्यामुळे महापालिका कर्मचार्‍यांना ते मते देण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत.

सरकारला शहराच्या सर्व भागातून प्रतिक्रिया आवश्यक असताना मुस्लीम बहुल भागात येणार्‍या या अडचणींमुळे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी हवालदिल झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवा, यामुळे त्यांच्या बैठका घेण्याचे नियोजन महापालिका करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही संदेश
महापालिका स्वच्छतेच्या नावाखाली सीएए व एनआरसी कायद्याबाबत आपली मते घेत असून, कोणीही संबंधित अ‍ॅप डाऊनलोड करू नये, कर्मचार्‍यांना आपली मते देऊ नयेत, अशा सूचना देणारे संदेश संबंधितांनी आपल्या ग्रुपवर प्रसारित करण्यास सुरूवात केली आहे. महापालिका अशांना शोधून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!