नगरमधील व्यावसायिकाला दोन लाखाचा घातला गंडा

ऑनलाईन फसवणूक । भिंगारमध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- कपड्याचा होलसेल व्यापारी असल्याचे सांगत खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मुकुंदनगर येथील व्यावसायिकाला दोन लाख रुपयांना उल्हासनगरच्या भामट्याने टोपी घातली. या प्रकरणी भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मुकुंदनगरमधील दानीश शमशुल शेख असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सागर केसवाणी असे आरोपी असलेल्या भामट्याचे नाव आहे. 3 सप्टेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 या काळात ही फसवणूक झाली.

शेख यांचे मुकुंदनगरमध्ये कापड विक्रीचे दुकान आहे. सागर केसवाणी याने त्यांच्या मोबाईल व्हॉटस्अ‍ॅपवर मालाचे फोटो टाकले. धिराग अपसेल्स नावाचे उल्हासनगर येथे होलसेल कापड दुकान असल्याचे सांगत शेख यांची ऑर्डर घेतली. व्हॉटस्अ‍ॅपवर व्हिजीटींग कार्ड, जीएसटी नंबर आणि बँक खात्याची माहिती पाठविली.

चांगला व नवीन माल देतो असे सांगून शेख यांच्याकडून 1 लाख 98 हजार 870 रुपये केसवाणी यांनी त्याच्या बँक खात्यात भरण्याचे सांगितले. त्यानुसार शेख यांनी पैसे भरले. त्यानंतर केसवाणी याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईलच बंद लागत होता. त्यामुळे शेख यांनी थेट उल्हासनगरला धाव घेत दिलेल्या पत्त्यावर दुकान शोधले. मात्र ते दुकान दुसर्‍याच मालकाचे असल्याचे समजले.

शिवाय केसवाणी याने अशाच प्रकारे अनेकांनी फसवणूक केल्याचे शेख यांना तेथे सांगण्यात आले. त्यानंतर शेख यांनी नगरमध्ये येत केसवाणी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *