Thursday, April 25, 2024
Homeनगरनशेबाजांचा ‘हिरकणी’ विसावा

नशेबाजांचा ‘हिरकणी’ विसावा

तुटका दरवाजा, जाळेजळमाटे अन् आडोसाही गायब

अहमदनगर – बाळाच्या स्तनपानासाठी एसटी महामंडळाच्या स्टॅन्डमध्ये असलेला हिरकणी कक्ष नशेबाजांच्या श्रमपरिहाराचे ठिकाण बनल्याचे धक्कादायक चित्र नगरात दिसले. कक्षाचा आडोसा अन् दरवाजाही तुटलेला, आतमध्ये जाळेजळमाटे अन् पक्षांची विष्ठा असे विदारक चित्र प्रत्यक्ष भेटीत दिसून आले. एसटीच्या कर्मचार्‍यांनी कक्ष ‘अडगळीची रूम’ करून ठेवली, तर फेरीवाल्यांसाठी हा कक्ष कचरा कुंडी असल्याचे वास्तवही भेटीत दिसले.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हिरकणीची गोष्ट सर्वश्रूत आहे. आपल्या तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी ‘ती’ रात्रीच्या गडद अंधारात रायगडचा गड उतरली होती. हिच प्रेरणा घेत मंत्रालयापासून ते बस स्थानकापर्यतच्या अन् सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्षांची व्यवस्था करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2015 मध्ये घेतला. बाळाला स्तनपान करतेवेळी कुचंबना होऊ नये हा कक्ष उभारण्याचा उद्देश. नगर शहरातील तारकपूर आणि माळीवाडा बस स्थानकातही असे कक्ष उभारण्यात आले आहेत. नगरच्या दोन्ही स्टॅण्डमधील कक्षाची अवस्था पाहता मूळ हेतू बाजूला पडल्याचे दिसले. सरकारी यंत्रणेचे दुलर्र्क्ष झाल्याने हे कक्ष जणू गर्दुल्यांचा अड्डा बनले आहे.

तारकपूर व माळीवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या कक्षांची अवस्था भयानक आहे. दरवाजे तुटलेले, विजेची व्यवस्था नाही. छत नसल्याने कक्षात पडलेली पक्षांची विष्ठा अशी कमालीची अस्वच्छता दिसून आली. कक्षाचा आडोसा व आतील खुर्च्या तुटलेल्या आहेत. लोखंडी फ्लेक्सच्या पट्ट्यांची अडगळ तेथे आहेे. साफसफाईचा विसर पडल्याने कक्ष जाळे-जळमाट्यांनी भरला आहे. नशा करून आल्यानंतर ‘श्रम परिहार’ करण्यासाठी या कक्षाचा वापर गर्दुल्यांकडून केला जात असल्याचे दृश्य या भेटीत दिसले. गर्दुल्यांना कोणीही हटकत नसल्याने हे ठिकाण त्यांनी निवडल्याचे दिसले.

तारकपूर आणि माळीवाडा बस स्थानकातील या कक्षांकडे ना परिवहन महामंडळ लक्ष ना कक्षाची देखभाल करणार्‍या स्वयंसेवी संस्थेचे. त्यांच्या दुर्लक्षामुळे कक्षांची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बस स्थानकात प्रवासी महिलांना कुचंबणा सहन करत उघड्यावरच बाळाला स्तनपान करावे लागत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या कक्षांची त्वरित दुरुस्ती करून ते स्तनदा मातांना वापरायोग्य करावेत, अशी मागणी महिला प्रवासीवर्गातून केली जात आहे.

शिवकाळातील हिरकणीच्या धौर्य आणि शौर्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडी-चोळीची भेट देवून कौतुक केले होते. आजच्या आधुनिक काळातील हिरकणीला बाळाला स्तनपान करतेवेळी कुचंबनेचा सामना करावा लागतो आहे.

एसटी महामंडळाने स्वच्छतेचा ठेका खासगी संस्थेकडे दिला आहे. कक्षाची पाहणी केली जाईल. कक्षाची दुरावस्था झाली असेल तर स्वच्छता केली जाईल. संबंधितांना स्वच्छतेचे आदेश देऊन कक्ष चांगला करण्यास प्राधान्य देऊ.
– अविनाश कलापुरे, आगारप्रमुख

अस्वच्छतेमुळे या कक्षात पाय सुध्दा ठेवू वाटत नाही. लाईट नाही, खुर्च्या निटनेटक्या नाहीत. महिलांनी कसा वापर करावा. या कक्षात स्तनपान केलं तर तर बाळा संसर्ग होईल. हा हिरकणी कक्ष नाही तर गोदाम आहे.
– रेखा गोरे, महिला प्रवासी

एसटीवाल्यांची अडगळ अन् फेरीवाले, प्रवाशांची कचराकुंडी
दोन्ही बसस्थानकावरील हिरकणी कक्षाचा वापर मूळ हेतूसाठी होत नसला तरी हे कक्ष बहुउपयोगीच म्हणावे लागेल! एसटी महामंडळातील कर्मचारी आडगळीचे सामान ठेवण्यासाठी या कक्षाचा वापर करतात. हे कमी म्हणून की काय फेरीवाले आणि प्रवाशांनी या कक्षाची अक्षरशः कचराकुंडी केली आहे. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, वेफर्सचे कागद, फळांच्या साली येथे सर्रासपणे टाकली जातात. काही महाभाग येथे मावा, पान खाऊन बिनदिक्कत पिचकार्‍याही मारतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या