Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘एनआरसी’, ‘सीएए’ विरोधात नगर शहरात संमिश्र प्रतिसाद

Share
नगर : भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद, Latest News City Bharat Band Respons Ahmednagar

बहुजन क्रांती मोर्चातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे

अहमदनगर (प्रतिनिधी) –  सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला नगर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील काही भाग वगळता स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळला गेला. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ‘एनआरसी’, ‘सीएए’ विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

एनआरसी, सीएए हटाओ, संविधान बचाओ, देश बचाओ, इन्कलाब जिंदाबाद आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. महापुरुषांच्या नावांचा जयघोष यावेळी करण्यात आला. या आंदोलनात हाजी शौकत तांबोळी, मन्सूर शेख, राजेंद्र करंदीकर, उबेद शेख, डॉ. परवेज अशरफी, घुगे शास्त्री महाराज, राज मोहंमद नूरी, अशोक गायकवाड, अर्शद शेख, बाळासाहेब मिसाळ, मौलाना खलील नदवी, मौलाना अबुल सालेम, मतीन सय्यद, डॉ. भास्कर रणन्नवरे, सोमनाथ शिंदे, आकाश जाधव, रफीक बागवान, नईम सरदार, अल्तमाश जरीवाला, फारुक रंगरेज, अज्जू शेख, वहाब सय्यद, हमजा चुडीवाला, फिरोज शेख, अविनाश देशमुख, संजय सावंत, सुभाष गायकवाड आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे एका विषयावर सर्वधर्मिय भारतीयांनी आवाज उठवला असून, सुधारित नागरिकत्वाच्या काळ्या कायद्याच्या विरोधात एल्गार आहे. संविधान विरोधात असलेल्या या कायद्याने देशात विषमता पसरणार असून, संपूर्ण देश कायदा रद्द होण्यासाठी एकवटला असल्याचे बहुजन क्रांती मोर्चातर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले. हिंसक पद्धतीचा अवलंब न करता, लोकशाही मार्गाने नागरिक स्वयंस्फुर्तीने बंदमध्ये सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले.

‘एनआरसी’ व ‘सीएए’ कायदा रद्द करून ईव्हीएम मशीनवर बंदी आणण्याची तर डीएनएच्या आधारावर एनआरसी लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. धरणे आंदोलनात प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर निशाणा साधून कायद्या विरोधात निषेध नोंदवला.

शहरातील माळीवाडा, पंचपीर चावडी, तख्ती दरवाजा चौक, माणिक चौक, कापड बाजार, मोची गल्ली, घास गल्ली, सर्जेपुरा, लालटाकी, मुकुंदनगर, पारशहा खुंट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट तसेच भिंगारमधील काही भागात बंद पाळण्यात आला. इतर ठिकाणी संमिश्रपणे बंदला प्रतिसाद मिळाला. बंदला जमाते उलेमा ए हिंद, जमाते ईस्लामे हिंद, जमाते अहले हदिस, सुन्नी उलेमा काउन्सिल, भारतीय विद्यार्थी मोर्चा, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, युनायटेड रिपाइं, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय आदिवासी संघटनांनी पाठिंबा दिला.

शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त
‘एनआरसी’, ‘सीएए’ विरोधातील बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील चौकाचौकांत पोलिसांचा दिवसभर पहारा होता. समाजमाध्यमावर सायबर सेलची करडी नजर होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!