चाईल्ड पोर्नोग्राफी : श्रीरामपूर, संगमनेरच्या दोघांसह तिघांना अटक

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) – लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ (चाईल्ड पोर्नोग्राफी), फोटो, मजकूर समाज माध्यमावर टाकून प्रसिद्ध करून व्हायरल करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. या गुन्ह्यांत जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

केतन बाळासाहेब मुंगसे (वय- 21 रा. वळदगाव, ता. श्रीरामपूर), नामदेव तुकाराम शेळके (वय- 59 रा. संगमनेर), सागर सुरेंद्र राऊत (वय- 29 रा. कुंभारगल्ली, जामखेड), अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सायबर सेलचे पोलीस हवालदार अरुण सांगळे यांनी फिर्याद दिली आहे.

सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींना अटक करण्याची कामगिरी झाली. गेल्या आठवड्यात राहुरीतील एक व भिंगारमधील एक अशा दोन तरुणांना अटक करण्यात आली होती. श्रीरामपूर, संगमनेर, जामखेडमधून तिघांना अटक करण्यात आली आहे. सायबर सेल जिल्ह्यातील 11 व्यक्तींचा शोध घेत आहे.

समाजमाध्यमावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ (चाइल्ड पोर्नोग्राफी), फोटोची तांत्रिक माहिती नॅशनल क्राईम ब्युरोने संकलित केली आहे. एनसीआरबीकडून ही माहिती सायबरला मिळाली असून गेल्या पाच महिन्यात राज्यभरात 1700 अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील 16 जणांच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. यापैकी आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर, बाकी 11 लोकांचा शोध सायबर सेल घेत आहे.

इंजिनीअर, कर्मचारी अन् दुकानदार
श्रीरामपूरमधून अटक करण्यात आलेला तरुण इंजिनीअर असून एका ठिकाणी नोकरीला आहे. संगमनेरमधून 59 वर्षीय व्यक्तीला पकडण्यात आले असून, ही व्यक्ती एका साखर कारखान्यामध्ये नोकरीला आहे. जामखेडमधील दुकानदाराला पकडण्यात आले असून त्यांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *