चिकन, अंडी दुकाने उद्यापासून उघडणार

चिकन, अंडी दुकाने उद्यापासून उघडणार

कलेक्टरांचे आदेश: १४४ आदेशाची मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढवली

अहमदनगर (प्रतिनिधी)- जमाव, संचार आणि वाहतूक बंदीसोबतच कार्यक्रम, जत्रा-यात्रा, पिक्चर थिएटरच्या बंदी आदेशाची मुदत कलेक्टरांनी आज १४ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. याच आदेशात जिल्ह्यातील चिकन व अंडी विक्रीच्या दुकांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे कलेक्टरांनी ही दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याची बाब समोर आली आहे. दारू विक्रीची दुकाने मात्र बंद राहणार आहेत.

कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी संचार, वाहतूक,फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास प्रतिबंधात्मक करणारा आदेश २३ मार्च रोजी कलेक्टरांनी काढला होता. ३१ ताारखेपर्यत हा बंदी आदेश होता. आता तो १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे.

शासकीय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, बँक, एटीएम, विमा सेवा, अत्यावश्यक सेवा मधील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने,अ‍ॅम्बुलन्स, रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅन्ड , बस थांबे व स्थानके, विमानतळ, रिक्षा थांबे, अत्यंविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान, दूध दुग्धोत्पादने , फळे व भाजीपाला, औषधालय, एलपीजी गॅस वितरण सेवा, विहित वेळेत पेट्रोल पंप (दररोज सकाळी ५ ते ९ वाजेपर्यत/ डिझेल विक्री सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत), जीवनावश्यक वस्तू, विक्री वितरीत व वाहतूक करण्यास परवानगी राहील ( गर्दी टाळून).

तसेच प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक) नियतकालिके, टि व्ही, न्यूज चॅनेल इत्यादी कार्यालये, दूरसंचार, पोस्ट व इंटरनेट सेवा पुरविणा-या आस्थापनासोबतच आता नव्या आदेशात चिकण व अंडी दुकाने, जनावरांचे खाद्य खुराक पेंड विक्री दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय दुकाने व वाहतूक सेवा चालू ठेवण्याची परवानगी कलेक्टरांनी दिली आहे. २३ तारखेच्या आदेशात चिकन दुकानांना बंदी होती, आता ती सुरू राहणार आहेत.

कोणतही व्यक्ती , संस्था व संघटनांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (४५ अ‍ॅक्ट १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ४३(१) अन्वये कारवाईस पात्र राहतील असे जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

शाळेसह हे राहिल बंद
सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा, कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणुक, मेळावे, आंदोलने, देशांतर्गत व विदेशी सहली काढण्यास २३ ते ३१ मार्च कालावधीत बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. तसेच कार्यक्षेत्रात असणारी दुकाने सेवा आस्थापना, उपहारगृह, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब-पब क्रीडांगणे, मैदाने जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, खाजगी शिकवणी वर्ग,व्यायाम शाळा संग्रहालय बंद राहतील. सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारणाशिवाय येण्यास मनाई करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com