Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लालपरीचे ‘परिवर्तन’: नाशिक विभागाला नव्या 11 बसेस; आपत्कालिन स्थितीत मिळणार तत्काळ मदत

Share

नाशिक । भारत पगारे

सार्वजनिक वाहतुकीसाठी परिवहन महामंडळाने जुन्या लालपरीत महत्त्वाचे बदल करून नव्याने ‘परिवर्तन’ ही बस सुरू केली आहे. या बसमध्ये साधे भाडेदरात प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोणत्याही हंगामात तोट्यात असले तरी, त्यांच्याकडून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ नवनवीन योजनांसह बसगाड्या नव्या रूपात आणण्यासाठी प्रयत्न होतांना दिसत आहेत. महामंडळाने नुकतेच लालपरीचे रूपडे बदलून तिच्या जाग्गी ‘परिवर्तन बस’ मार्गांवर धावण्यासाठी तयार केली आहे. या नव्या परिवर्तन बसचा राज्यातील प्रयोगिक तत्वावरील पहिला प्रयोग नाशिक विभागात राबविला जात आहे. त्यासाठी महामंडळाने 11 नव्याकोर्‍या परिवर्तन बस जिल्ह्याच्या वेगवेगळ्या डेपोंमधून सोडणे सुरू केले आहे.

राज्य परिवहन महामंडळाने 1 जून 2019 रोजी नुकतीच लालपरीची एक्काहत्तरी साजरी केली. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद घेऊन खेडोपाडी विहार करणारी महाराष्ट्राची जीवनवाहिनी खर्‍या अर्थाने रोज लाखो प्रवाशांना इच्छितस्थळी नेऊन सोडते. कालपरत्वे महामंडळानेदेखील प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासह सुखाचा प्रवास होण्यासाठी पावले उचलली असून लालपरीच्या रूपड्यात वेळोवेळी आवश्यक बदल केले आहेत.

आता नुकतेच दसर्‍याचे औचित्य साधून परिवहन महामडळाने नव्या ढंगातील परिवर्तन बसचा अनुभव प्रवाशांना देणे सुरू केले आहे. महामंडळाने जुन्या लालपरीत याबसची बांधणी केली आहे. जुन्या लालपरीची चेसिस वापरून भारत स्टेज-4 (बीएस-4)चे इंजिन जोडले आहे. तसेच एमएस अर्थात मॉड्युलेट स्टील वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे बसमध्ये व्हीटीस अर्थात व्हीइकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्यात आली असून आपत्कालिन स्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळविण्यासाठी ‘पॅनिक’ बटनची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी आहे परिवर्तन बस

बसमध्ये नव्याने वाहक आणि चालकाला फोन चार्जिंग करण्यासाठी दोन सॉकेट देण्यात आले आहे, तर प्रवाशांनाही फोन चार्जिंग करण्यासाठी 2 सॉकेटसह 2 यूएसबी पोर्टचे सॉकेट देण्यात आले आहे. तसेच सुस्पष्ट मार्गिका एलईडी डिस्प्ले, उभे राहून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी फायबरचे हॅण्डल, नविन 2 बाय 2 आसनव्यवस्था, प्रखर लाईट्स, प्रत्येकी 2 आणि 4 किलोचे अग्निरोधक सिलेंडर बसविण्यात आले आहे. संकटकालिन मार्ग, प्रथमोपचार पेटी.

बसचा लक्झरीयस कायापालट

नव्या बसची बांधणी करतांना तिला लक्झरी बससारखे रूप देण्यात आले आहे. तसेच पूर्वीचा लाल रंग न ठेवता लाल आणि पांढरा शुभ्र रंगसंगत देंण्यात आली आहे. त्यामुळे लांबूनही बसचा लक्झरीअस लूक सर्वांना भावतो आहे.

‘एबीएस’ सिस्टिमसह व्हीटीएस

प्रवास सुकर व्हाव व आपत्कालिन स्थितीत तत्काळ ब्रेक लागावे म्हणून अ‍ॅडव्हान्स ब्रेक सिस्टिम बसविण्यात आली आहे. दरम्यान, या नव्या 11 बसेसमध्ये व्हीटीएस यंत्रणाही असून, बसचा मार्ग, बसस्थानकावर पोहोचण्याची निर्धारीत वेळ, ती कोठी थाबली आहे यासह वाहक आणि चालकाचे नाव, संपर्क नंबरही अपडेट करण्यात आले आहे. व्हीटीएसला ‘पॅनिक’ बटन यंत्रणा जोडण्यात आली आहे. हे बटन दाबल्यास प्रवासातच जवळच्या डेपोसह पोलीसांची मदत मिळणार आहे.

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

आजमितीस प्रायोगिक तत्वावर अकरा परिवर्तन बसेस विभागाला मिळाल्या आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद त्याला लाभतो आहे. वेगवेगळ्या डेपोतून लांबपल्ल्याच्या मार्गांवर या बस धावत आहेत.

-नितीन मैंद, विभाग नियंत्रक, रा. प. म, नाशिक विभाग.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!