Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

चांद्यात आठ ते नऊ बंद घरांवर चोरट्यांचा हातोडा

Share
चांद्यात आठ ते नऊ बंद घरांवर चोरट्यांचा हातोडा, Latest News Chanda Thife Demand Investigation Chanda

सामानाची उचकापाचक मात्र वित्तहानी नाही; चोरट्यांचा तपास करण्याची मागणी

चांदा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील चांदा येथे पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातला. बंद असलेल्या आठ, नऊ घरांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांना विशेष काही हाती लागले नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने या परिसरात घबराट पसरली आहे. सायंकाळपर्यंत यासंदर्भात सोनई पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.
काल रात्री चांदा गावात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. मध्यरात्रीनंतर गावातील प्राथमिक शिक्षक नितीन राठोड हे श्री. जावळे यांच्या मालकीच्या घरात भाडोत्री राहतात.

त्या घराचे कुलूप चोरट्यांनी धारदार शस्त्रांनी तोडले. नंतर घरात प्रवेश करत सर्व संसारोपयोगी सामानाची उचकापाचक केली. राठोड हे सुट्टी असल्याने आपल्या गावी गेलेले होते. तेथून शेजारीच असलेल्या दत्तात्रय जावळे यांच्या बंद खोलीचे कुलूप तोडले. तेथेही उचकापाचक केली, त्यानंतर त्याच गल्लीतील प्रशांत कानडे यांच्या घराकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. त्यांच्या घरच्या लोखंडी गेट व दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. प्रशांत व त्यांचा भाऊ नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असल्याने त्यांच्या आई तेथे राहतात.

मात्र, त्याही बाहेरगावी गेलेल्या होत्या. त्यामुळे घराला कुलूप होते. तेथेही घरातील सर्व कपड्यांची उचकापाचक केली. स्वयंपाक घरातील सामानाची उचकापाचक करत नासधुस केली. त्यानंतर कुंभार गल्लीतील भानुदास धुमाळ यांच्या बर्‍याच दिवसांपासून बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून उचकापाचक केली. तेथून जवळच असलेल्या सुनील केळगद्रे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत संसारोपयोगी वस्तूची उचकापाचक केली. कपाट उघडून आतील सामानाची उचकापाचक केली.

स्वयंपाकघरातही सर्व डबे उघडून ठेवले. त्यानंतर श्रीसोमेश्वर मंदिराजवळ असलेले ज्येष्ठ डॉक्टर दीपक शिंदे यांच्या दवाखान्याचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. तेथेच जवळ राहत असलेल्या दत्तात्रय चौरे यांच्या जुन्या बंद घराचे कुलूप तोडले. तेथून पुढे चांदा-कुकाणा रोडवरवरील राजेंद्र काशिनाथ दहातोंडे यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र श्री. दहातोंडे यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.

संगीता निंबाळकर याच्या घरीही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. रात्री तीन साडेतीनपर्यंत हा धुमाकूळ चालू होता. सकाळी ही घटना गावचे पोलीस पाटील कैलास अभिनव यांना समजताच त्यांनी घटनेची माहिती सोनई पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चांदा बिटचे हे. कॉ. शिवाजी माने सहकार्‍यांसह घटनास्थळी उपस्थित झाले. सर्व ठिकाणांची पाहणी करून पंचनामा केला. मात्र, या घटनेत कुणीही आमचा काही मुद्देमाल चोरीस गेला अशी तक्रार दिली नसल्याची माहिती समजते.

याबाबत सोनई पोलिसांत सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, एकाच रात्रीच भरवस्तीच्या गजबजलेल्या ठिकाणच्या बंद घरावर चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या प्रयत्नामुळे चांदा आणि परिसरात चांगलीच घबराट पसरली आहे. या घटनेत चोरट्यांची संख्या नेमकी किती होती. हे निश्चित कुणालाही सांगता आले नसले तरी, ते जास्त प्रमाणात असावेत असे प्रत्येकाचे म्हणणे होते. सदर घटनांची खबर संबंधित घरमालकांना सकाळी शेजारील लोकांनी दिली.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!