चांद्यात छापा टाकून 11 किलो गांजा पकडला

एका आरोपीस अटक, दुसरा पसार; 10 मे पर्यंत पोलीस कोठडी

सोनई (वार्ताहर)– नेवासा तालुक्यातील चांदा येथे पोलिसांनी छापा घालून 12 किलो गांजा पकडला असून याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसरा पसार झाला आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांना गुप्त खबर्‍याकडून विश्वसनीय माहिती मिळाली की, चांदा शिवारात गांजाची चोरुन वाहतूक व विक्री केली जात आहे.

या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी सोनई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जनार्दन सोनवणे यांचे पथकासह चांदा भागात सापळा रचला असता 5 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घोडेगाव (शनीशिंगणापूर कमान) ते चांदा जाणार्‍या रोडवर चांदा शिवारात गट नंबर 704 चे बांधालगतचे विहिरीजवळचे कच्च्या रोडवर आरोपी बाळू बापू फुलमाळी रा. चांदा ता. नेवासा व त्याचा अनोळखी साथीदार (नाव, गाव माहिती नाही) हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता उग्रवासाचे कळ्या, फुले या स्वरुपातील गांजा नावाचा गुंगीकारक मादक पदार्थ ओलसर स्वरुपातील 11 किलो 336 ग्रॅम वजनाचा अंदाजे 68 हजार 16 रुपये किंमतीचा पांढर्‍या रंगाच्या बारदान गोणीत गुंडाळून सहा प्लॅस्टिक पिशव्या, वर्तमानपत्राचे कागद व नायलॉन दोरीसह तसेच 20 हजार रुपये किंमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल (एमएच 12 डीएन 8210) मिळून आली.

शेवगाव उपविभागातील पोलीस हवालदार नितीन विक्रमराव दराडे याननी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन एनडीपीएस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 20 व 22 प्रमाणे 154/2020 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी बाळू बाबू फुलमाळी रा. चांदा व त्याच्या सोबतचा अनोळखी साथीदारव यांनी अज्ञात ठिकाणाहून मिळालेल्या मालाप्रमाणे 68 हजार 16 रुये किंमतीचा गांजा आयात करुन तो चोरुन विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळचे मोटारसायकलवरुन वाहतूक करीत होते. पोलीस आल्याची चाहुल लागताच दोघेही आरोपी मुद्देमाल तेथेच टाकून पसार झाले. मात्र सोनई पोलिसांनी फुलमाळी यास अटक करुन नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 10 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गांजा पकडण्याच्या पथकात स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, शेवगाव उपविभागाचे हवालदार नितीन दराडे, श्री. इलग, बुधवंत तसेच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे, ज्ञानेश्वर थोरात, हवालदार संजय चव्हाण, पालवे, किरण गायकवाड, सोमनाथ झांबरे, बाबा वाघमोडे या पथकाचा समावेश होता.