मृत्यूच्या दारातच त्यांच्याकडून जीवनाचा ‘आरंभ’

कॅन्सरग्रस्तांना नगरमध्ये मिळतोय मायेचा स्पर्श

अहमदनगर – जीवनाचे शाश्वत आणि अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. या मृत्यूला तर सर्वांनाच सामोरं जावं लागतं. परंतु काही असाध्य दुर्धर आजारांमुळे काहींना आपला डाव अर्ध्यवरती मोडावा लागतो, तोही अकस्मात! मात्र, अशाही अवस्थेत मृत्यूला हसत कवटाळण्याची ताकद दिली जातेय ती नगरच्या आरंभ पॉलिएटिव्ह कॅन्सर सेंटरच्या टीमकडून निराधार, अनाथ, तसेच अंतकाळी स्वकीयांकडूनच अवहेलना पदरात पडलेल्या कॅन्सरग्रस्तांना आरंभच्या रूपाने मायेचा ओलावा देण्याचं काम करतोय एक ध्येयवेडा तरुण. प्रदीप विजयसिंह काकडे असे त्याचे नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याच्या मोहखेड गावचा. 1988 साली वडील भारतीय सेनादलातून नगर येथे निवृत्त झाल्यांनंतर ते भिंगार लगत असलेल्या लष्करी तळाजवळील केकती येथे स्थायिक झाले. नगर महाविद्यालयामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन 1999 साली काकडे एसटी महामंडळात वाहकपदी रुजू झाले. चाकोरीबद्ध जीवन जगत असताना समाजाचे आपण काही तरी देणे लागतो ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

अशातच एका जवळच्या नातेवाईकाचा कॅन्सरमुळे झालेला मृत्यू व त्याहीपेक्षा भयानक अशी त्या रुग्णाची घरच्यांकडूनच झालेली हेळसांड, अवहेलना. चौथ्या स्टेजच्या कॅन्सरमुळे एका अंधार्‍या खोलीत अक्षरशः फेकून दिल्यागत मृत्यूशय्येवर मरणाची वाट पहात असलेला ‘त्या’ रुग्णाच्या हृदय पिळवटून टाकणार्‍या घटनेतूनच खर्‍याअर्थाने प्रारंभ झाला तो आरंभ पॉलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटरचा. खरंतर या घटनेने अस्वस्थ झालेल्या काकडे यांनी त्याच वेळी कॅन्सरग्रस्तांसाठी काही तरी करायचेच हे मनोमन ठरवले. चौथ्या स्टेजचा कॅन्सर हा तसा मृत्यूला कवटाळणारा असला, तरी वेदनेने विव्हळत असणार्‍यांना मायेचा ओलावा देऊन त्यांचा शेवट गोड करायचा व त्यांना हसत वाटेला लावण्याचा निर्धार काकडे यांनी मनाशी पक्का केला.

याकामी त्यांना शिवाजी जाधव, चाँद शेख, गणेश भोसले, विवेक शिंदे, दीपक इरोळे, नितीन भोसले, महेश वाघ, अविनाश निमसे या आरंभच्या टीमने मनोबल दिले. या खंबीर पाठिंब्याने काकडे यांनी पावले उचलली. कोणतेही वैद्यकीय शिक्षण झाले नसल्यामुळे यातही अनेक अडचणी येत होत्या. विविध ठिकाणी जाऊन कॅन्सरविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला.2017 साली डॉ. अविनाश सावजी यांनी घेतलेल्या ‘कॅन्सर योद्धा’ संमेलनात भाग घेतला. यांनतर पुण्यात असलेल्या सिप्ला पॉलिएटिव्हच्या डॉ. डेव्हिड ओलिव्होरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.

यानंतर मुंबईचे टाटा पॉलिएटिव्ह, बांद्रा येथील शांती आवेदना, नागपूर येथील स्नेहांचल पॉलिएटिव्ह अशा बर्‍याच ठिकाणी जाऊन शेवटच्या टप्प्यातील कॅन्सर रुग्णासाठी कसे काम करायला पाहिजे, ते शिकण्याचे प्रयत्न केले. याकामी त्यांना डॉ. अविनाश सावजी, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. रोहन खर्डे, डॉ. भूषण निकम, डॉ. प्रियदर्शन कुलकर्णी, उल्का धुरी, अरविंद पित्रे, सुचिता भोजकर, पूनम बगाई, डॉ. दत्तात्रय अंदुरे, सुधीर लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले व याचेच फलित म्हणून 5 जून 2017 रोजी आरंभ पॉलिएटिव्ह केअर सेंटरची नगर मध्ये स्थापना झाली.

यांनतर 3 फेब्रुवारी 2019 रोजी नगर ते अमरावती अशी कॅन्सर प्रबोधन रॅली काढली. यातून 7 मेडिकल कॉलेज व 3 कॅन्सर हॉस्पिटल ‘आरंभ’ शी जोडले गेले. गेल्या काही दिवसापासून नगर येथे रुग्ण सांभाळायला सुरुवात केली त्यासाठी आरंभला स्नेहालय संस्थेने त्यांच्या हॉस्पिटलमधील एक 5 बेडेड वॉर्ड दिला आहे. आरंभ आता शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, सण, समारंभ, धार्मिक कार्यक्रम आदींमधून ठीकठिकाणी जनजागृती करत असून गोरगरीब, निराधार कॅन्सर रुग्णांना मायेची उब देत आहेत.

वेदनारहित उपचाराच्या माध्यमातून आतापर्यंत चौथ्या स्टेजमधील तेरा कॅन्सर रुग्णांच्या अंतिम इच्छाही आरंभने पूर्ण करून मृत्यूच्या दारात असणार्‍या या रुग्णांचा शेवट गोड केला आहे. यामध्ये एका मुलाची सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांना भेटण्याची तर कॅन्सरमुळे सर्वांगावर सूज येऊन अंध झालेल्या आजींना आपल्या नातवंडांना पाहण्याची अशा एक ना अनेक इच्छा आरंभने आतापर्यंत पूर्ण करून जगण्याचे बळ देण्याचा प्रयत्न केला. विविध संस्थांनी आतापर्यंत आरंभाच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला असून नगरमध्ये सुरु झालेले हे काम देशपातळीवर नेण्याचा मानस काकडे यांनी व्यक्त केला आहे. या सर्व कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी तनमन व धनाने पुढाकार घेऊन समाजाप्रती उतराई होण्याचे आवाहन काकडे यांनी केले आहे.