Wednesday, April 24, 2024
Homeनगरबायपासचे काम महिनाभरात न झाल्यास कारवाई करा

बायपासचे काम महिनाभरात न झाल्यास कारवाई करा

खा. डॉ. विखे यांच्या अधिकार्‍यांना सूचना : केंद्रांच्या योजनांमध्ये लक्ष घालणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंतप्रधान कृषी सन्मान योजनेमध्ये महाराष्ट्रात नगरचा प्रथम क्रमांक लागला आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित असणार्‍या सर्व योजनांचा लवकर आढावा घेऊन प्रकल्प पूर्णत्वाला कशा पद्धतीने जाईल, याची जबाबदारी मी घेतली असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नगरच्या बायपासच्या दुरुस्तीचे काम एक महिन्यात पूर्ण झाले नाही, तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. नगर-मनमाड महामार्ग हा सहापदरी करण्यापेक्षा, आहे तोच कशा पद्धतीने चांगला करता येईल, याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी लवकरच निधी मिळविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

नगर येथे कृषी, नॅशनल हायवे आदींची बैठक पार पडल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. विखे म्हणाले, पंतप्रधान कृषी योजनेमध्ये नगर जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकर्‍यांना त्याचा फायदा मिळाला आहे. दोन टप्प्यांमध्ये त्यांना रक्कम देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात नगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. रस्त्यांसदर्भात झालेल्या बैठकीत नगर बायपास संदर्भात चर्चा झाली. ठेकेदाराची मुदत 2018 साली संपली. त्याला मुदतवाढ कशी दिली, हा खरा प्रश्न आहे. आता त्यांच्याकडूनच काम करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जानेवारीअखेरपर्यंत काम पूर्ण केले नाही, तर संबंधितांवर कारवाई करण्याचेही सांगितले आहे. नगर-कोपरगाव हा महामार्ग सहापदरी करण्यासाठी विषय घेतला आहे. अगोदर सहापदरी करण्यापेक्षा, आहे त्याच महामार्गाची दुरुस्ती चांगल्या पद्धतीने कसे होईल यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी निधी कसा मिळेल, याकरिता आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. नॅशनल हायवे व्हायला आमचा विरोध नाही, मात्र आहे तोच रस्ता कसा व्यवस्थित केला जाईल, कारण या रस्त्याला महापालिकेच्या पाईपलाईन आहेत.

हे पाईपलाईन स्थलांतराचे काम अतिशय जिकरीचे आहे. त्यामुळे त्याला पुढे भविष्यात पाच ते सहा वर्ष लागेल. त्यापेक्षा आहे तोच रस्ता चांगला करून द्या, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू केला असल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या माध्यमातून जी कामे आहेत, ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यासंदर्भात सुद्धा आता मी सर्व नगरपालिकांची एकत्रित बैठक घेणार आहे. महापालिके संदर्भात आठ जानेवारीला बैठक होणार आहे. त्या दिवशी सर्व विषयांचा आढावा घेऊन कोणत्याही प्रकारे कामे प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विखे पॅटर्न संपलेला नाही – डॉ. विखे
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमच्याकडे संख्याबळ नव्हते व राष्ट्रवादीनेही अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली होती. त्यामुळे या निवडणुकीतून माघार घेतली. पण केवळ एका निवडणुकीवरून तुम्ही राजकीय अंदाज बांधू नका. जिल्ह्यातील राजकीय गणितांचा भविष्यात उलगडा होत जाईल. आगामी काळात जिल्ह्यात आमचा वेगळा पॅटर्न दिसेल, असे खा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. आम्ही पक्षाच्या भूमिकेत नेहमीच संलग्न आहोत, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या