Type to search

Featured नाशिक

वाकडी बारव कारंजा ‘व्हाईटनर गँग’च्या ताब्यात

Share

जुने नाशिक । प्रतिनिधी

जुने नाशिकची राजधानी म्हणून प्रसिद्ध चौक मंडई येथील वाकड बारव कारंजाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने तो गरदुल्ले व व्हाईटनर गँगचा अड्डा झाला आहे. भरवस्तीत कारंजाचा गैरवापर होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मनपा प्रशासनाने त्वरित कारंजाकडे लक्ष देऊन त्याचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी समाजसेवक अब्दुल बावा यांनी केली आहे.

पैगंबर जयंती मिरवणूक असो की गणेश विसर्जन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणूक सर्व जातीधर्माच्या मुख्य मिरवणुकाच याच वाकडी बारव येथून सुरू होऊन पुढे जातात. या ठिकाणी प्राचीन पार व वाकडी बारव आहे. नाशिकचे माजी खा. स्व. राजाभाऊ गोडसे यांनी विशेष लक्ष देऊन या चौक मंडई कारंजाला सुशोभीत केले होते. यानंतर मात्र कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही.

हळूहळू कारंजा दुर्लक्षित झाल्याने त्यात लावण्यात आलेले सजावटीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले, यामध्ये पाण्याचे फवारे, विद्युत लाईट आदींचा समावेश होता. आता या ठिकाणी फक्त सिमेंटचा घेरा शिल्लक राहिला असून त्याचा ताबा व्यसन करणार्‍यांनी घेतला आहे. सध्या या ठिकाणी गरदुल्ले व व्हाईटनरचा नशा करणार्‍यांचा अड्डा बनला आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही अल्पवयीन मुले व मुलींचादेखील समावेश आहे. मनपासह पोलिसांनी देखील याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मुलांच्या भविष्याला धोका

शहरात सध्या विविध प्रकारच्या नशा (व्यसन) घेण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुला व मुलींचादेखील समावेश दिसतोय. चौक मंडई कारंजामध्ये होणार्‍या गैर प्रकाराला वेळी थांबविण्याची गरज असून मनपा तसेच पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे. यामुळे लहान मुलांचे भविष्यात धोक्यात येत आहे.

-अब्दुल बावा,समाजसेवक, जुने नाशिक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!