साईबाबा जन्मभूमी वादावर अखेर पडदा

साईबाबा जन्मभूमी वादावर अखेर पडदा

जन्मस्थळ म्हणून नव्हे तर पाथरी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी ः मुख्यमंत्री

शिर्डी (प्रतिनिधी)-  साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच या वादात शासनाला पडायचे नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे शिर्डीकरांचे समाधान झाल्याने वादाला पूर्णविराम मिळाला आहे.

साईबाबांची जन्मभूमी असल्याचा दावा केला जात असलेल्या पाथरीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. त्यावरून वाद उद्भवला आहे. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळच नाही, असा आक्षेप शिर्डीतील ग्रामस्थांनी घेतला आहे. या वादामुळे शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी बेमुदत बंदचे आवाहन केले होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांची मुंबई येथे बैठक आयोजित करून या वादावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले व शिर्डी बंदचे आवाहन मागे घ्यावे, असे सांगितले. त्यानंतर शिर्डी बंदचे आवाहन मागे घेण्यात आले.

यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर काल दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांची बैठक घेतली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खा. सदाशिव लोखंडे, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.

पाथरीला तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी देण्यास शिर्डीकरांची हरकत आहे का? असा मुद्दा बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यावर शिर्डीतील ग्रामस्थांनी तीर्थक्षेत्र योजनेतून गावाला निधी द्या. पण साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून निधी देण्यास आमची हरकत असल्याचे नमूद केले. त्यावर शासन हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा उल्लेख करणार नाही. त्या वादात आम्हाला पडायचे नाही. मात्र तीर्थक्षेत्र म्हणून या गावाला निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यावर समाधान झाल्याने शिर्डीतील बंद ग्रामस्थांनी कायमस्वरुपी मागे घेतला आहे.

मी जनतेची गार्‍हाणी ऐकायला बसलो आहे. शिर्डीकरांनी माझ्याशी चर्चा करण्यापूर्वी बंद करायला नको होता, अशा भावनाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

साईबाबांना जात, धर्म नाही असे आम्ही लहानपणापासून ऐकले आहे. त्यामुळे साईबाबांचे जन्मस्थळ व त्यांचे वंशज शोधणे योग्य नाही, अशी भूमिका यावेळी ना. बाळासाहेब थोरात व आ. राधाकृष्ण विखे यांनी मांडली.

बैठकीला शिर्डीतून नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, नगरसेवक अभय शेळके, विजय जगताप, अनिरुद्ध गोंदकर, डॉ. एकनाथ गोंदकर, सुनील गोंदकर, दत्तात्रय कोते, जगन्नाथ गोंदकर, विजय गोंदकर, नितीन कोते, सचिन कोते, संजय शिंदे, ज्ञानेश्‍वर गोंदकर, बाबासाहेब कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, अशोक गोंदकर, रतीलाल लोढा, राजेंद्र गोंदकर, रवींद्र गोंदकर, विनायक रत्नपारखी, प्रमोद आहेर, नवनाथ दिघे, सुनील बारहाते, हरिचंद्र कोते, सलीम पठाण, सलीम शेख, गफ्फार पठाण, अशोक कोते, समीर शेख, आप्पासाहेब कोते, विजय कोते, विनायक कोते, बाळासाहेब गायकवाड, हौशीराम कोते, उत्तमराव कोते, साईराज कोते, गणेश कोते, संदीप पारख, नरेश सुराणा, अजय नागरे, कैलास कातोरे, गणेश आगलावे, संदीप वाबळे, गणीभाई पठाण, प्रमोद गोंदकर, विजय कातोरे, पोपट शिंदे, दिपक वारुळे, शब्बीर सय्यद, मधुकर जगताप, गोपीनाथ गोंदकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com