Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची लुटमार करणारी टोळी जेरबंद

Share

नाशिक | प्रतिनिधी

महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीच्या नवीन पिकअप इतर राज्यांसह देशातील सिमावर्ती देशांमध्ये डिलीव्हरी करण्यासाठी मुंबई येथील नारायणी ट्रान्सपोर्टचे चालक मुंबई आग्रा महामार्गाने नेहमी वाहतुक करीत असतात. दि. 18 जानेवारी 2020 रोजी नारायणी ट्रान्सपोर्टचे चालक कृश्णकुमार सिंग चंद्रसेठसिंग, रा. सुलतानपुर, उत्तरप्रदेश हे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीची नवीन पिकअप डिलीव्हरी देण्यासाठी मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक बाजूकडून मालेगाव-धुळे मार्गे घेवुन जात असतांना, पहाटेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील टेहरेगाव शिवारात अज्ञात आरोपींनी त्यांचे पिकअप गाडीला सिल्व्हर रंगाची मारूती व्हॅन आडवी लावुन त्यांचे डोक्याला छ-याची बंदुक लावुन मारहान करत त्यांचे जवळील नवीन महिंद्रा पिकअप गाडी, मोबाईल फोन व रोख रूपये असा एकुण 5 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेला होता.

सदर घटने बाबत मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 10/2020 भा. द. वि. कलम 394,34 याप्रमाणे दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे पथकाने वरील गुन्हयाचा समांतर तपास सुरू करत गुप्त माहितीच्या आधारे संशयित 1) गोरख अशोक गांगुर्डे, रा. सोमवार हट्टी, चांदवड यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने त्याचे साथीदार 2) सुनिल गोविंद डगळे, रा. खेडगाव, ता. दिंडोरी 3) रोहित जयराम गांगुर्डे, रा. औताळे, ता. दिंडोरी व 4) निरंजन तुळषीराम मंगळे, रा. ओझर टाउनशिप, ता. निफाड यांचेसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील आरोपींना खेडगाव, ता. दिंडोरी व ओझर परिसरातुन ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेले सर्व आरोपींना वरील गुन्हयाचे समांतर तपासात अधिक विचारपुस केली असता, आरोपी गोरख गांगुर्डे व सुनिल डगळे हे दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतक-यांचा माल मार्केटला विक्री करण्यासाठी पिकअपवर ड्रायव्हर म्हणुन काम करत होते. त्यांनी दोघांनी मिळुन महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीची परराज्यात डिलीव्हरीसाठी घेवुन जाणारी एक नवीन पिकअप वाहन चोरण्याची योजना बनविली.

त्याप्रमाणे (दि.18) जानेवारी रोजी वरील सर्व आरोपींनी ओझर येथील निरंजन मंगळे याचे मारूती व्हॅनमध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील टेहरे गावचे शिवारात जावुन तेथे धुळे बाजुकडे जाणारी एक नवीन पिकअप गाडी अडविली. त्यावरील चालकास छ-याचे बंदुकीचा धाक दाखवुन मारहान करून त्याचेकडील महिंद्रा कंपनीची नवीन पिकअप गाडी, मोबाईल फोन व रोख रूपये असा मुद्देमाल जबरीने लुटमार केली आहे. तसेच यातील सर्व आरोपींनी चोरी केले नंतर 03 ते 04 दिवसांनी खेडगाव येथे सदर पिकअप गाडीचे स्पेअर पार्टस् चेसिस, कॅबिन, ट्रॉली, इंजिन, डिस्कसह टायर असे खोलुन वेगवेगळे केले. त्यानंतर सदर स्पेअर पार्टस् विक्री करून पैसे आपसात वाटुन घ्यायचे ठरविले.

त्याप्रमाणे वरील आरोपींनी यातील चोरी केलेले पिकअप गाडीची ट्रॉली शिरसगाव, ता. निफाड येथील अनिल विष्णू चौरे यास विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यावरून अनिल विष्णू चौरे यास ताब्यात घेण्यात आले, त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता वरील आरोपींनी चोरून आणलेले पिकअप गाडीचे इतर पार्टस् विक्री करण्यासाठी सदर आरोपी विष्णू चौरे याने मदत केली आहे. तसेच यातील आरोपी सुनिल डगळे याने चोरी केलेले पिकअप गाडीचे टायर व डिस्क त्याचे मालकीचे पिकअप क्र. एम. एच.15 जी. व्ही. 5437 या वाहनास बसविल्याचे समजले असुन सदर आरोपींनी गुन्हा करते वेळी त्यांचा साथीदार निरंजन मंगळे याची मारूती इको व्हॅन वापरली असल्याची तपासात निष्पन्न झाले.

वरील आरोपींनी सदर गुन्हयात चोरीस गेलेले महिंद्रा पिकअपचे स्पेअर पार्टस्, गुन्हयात वापरलेली मारूती इको व्हॅन, तसेच चोरी केलेले पिकअपचे स्पेअर पार्टस् बसविलेल्या 2 महिंद्रा पिकअप गाडया असा एकुण 13 लाख 62 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल गुन्हयाचे पुढील तपासकामी मालेगाव छावणी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह मॅडम व अपर पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, पो.उ.प.नि. मुकेश गुजर, स.पो.उ.नि अरूण पगारे, पो.ह.वा संजय गोसावी, पो.ना हेमंत गिलबिले, पो.कॉ मंगेष गोसावी, सुशांत मरकड, सचिन पिंगळे, प्रदिप बहिरम, संदिप लगड, चा.पो.ना. भूषण रानडे यांचे पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!