Type to search

Breaking News Featured नाशिक

लोणारवाडीचे उपसरपंच कार अपघातात ठार

Share

सिन्नर । प्रतिनिधी

सिन्नर घोटी महामार्गावरील लोणारवाडी गावाजवळ दोन कारचा समोरा-समोर भिषण अपघात होऊन लोणारवाडीचे उपसरपंच, हॉटेल मामाश्रीचे संचालक ज्ञानेश्वर विष्णू गोळेसर (52) त्यात ठार झाल्याची घटना शनिवारी (दि.24) रात्री 8.30 च्या दरम्यान घडली.
गोळेसर यांचे घोटी रोडवरीलच भाटवाडी फाट्यावर मामाश्री हॉटेल असून श्रावणात पूर्ण महिनाभर ते हॉटेल बंद ठेवतात. शनिवारी पहाटेच ते भद्रा मारुतीचं दर्शन घेऊन परतले होते. दिवसभर हॉटेलमध्येच आवरा-सावर करत ते थांबून होते.

रात्री 8.30 च्या दरम्यान ते आपल्या स्विफ्ट डिझायर कार क्र. एम.एच.- 15/डी.एम. 1910 ने लोणारवाडीतील घराकडेे ते परतत होते. जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर पूढच्या बाजूने चाललेल्या मोटार सायकलस्वारांना वाचवतांना समोरुन येणार्‍या निक्सा कार क्र. एम.एच. 43/बी.के. -9500 शी स्विफ्टची ठोस झाली. निक्साच्या एअर बॅग तात्काळ उघडल्याने कारमधील दोघांना किरकोळ जखमांवर निभावले. मात्र, गोळेसर यांची कार ड्रायव्हर साईडने दाबली गेल्याने गोळेसर हे त्यात अडकले.

शेवटी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढावे लागले. अपघात झाला त्यावेळी रस्त्यावरच गावाच्या दहीहंडीचा कार्यक्रम सुरु होता. शेकडो कार्यकत्यार्ंनी अपघातस्थळाकडे धाव घेतली. सरपंच डॉ. सदाशीव लोणारे, आप्पा पवार, संजय लोंढे यांनी त्यांना तातडीने सिन्नरच्या खासगी दवाखान्यात नेले. मात्र, उपचारपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. गोळेसर हे दोन महिण्यांपूर्वीच उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले होते. गावासह तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडीवर असणार्‍या गोळेसर यांनी स्वत:चा मोठा मित्र परिवार जमवला होता.

त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. नगर परिषदेच्या रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर आज (दि.25) सकाळी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, आजी, पत्नी, दोन मुले, दोन विवाहीत मुली, सुना-नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, दोन्ही कारची ठोस झाली तेव्हा त्यांच्या मागे चालणार्‍या दोन मोटार सायकलवरील चौघेही जखमी झाल्याचे समजते. हे चौघेही वडगाव सिन्नर येथील असले तरी त्यांची नावे समजू शकली नाहीत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!