Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशेततळ्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू

शेततळ्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू

सिन्नर । वार्ताहर

सिन्नर तालुक्यातील दापूर शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.12) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

विष्णू एकनाथ पवार (40) व मुलगा प्रतीक विष्णू पवार (6) अशी मृतांची नावे आहेत. तालुक्यातील चिंचोली येथील विष्णू पवार हे मुळचे रहिवाशी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सासरवाडी असलेल्या दापूर येथे ते कुटुंबियांसह रहात होते.

दुपारी 12 वाजता विष्णू पवार हे आपल्या दोन्ही मुलांसह शेळ्या चारण्यासाठी दरा शिवारात गेलेले होते. या भागात संभाजी शिवाजी आव्हाड यांचे शेततळे असून प्रतीक हा शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी डोकावला असता, त्याचा पाय घसरला आणि तो थेट तळ्यात पडला.

मुलाला वाचविण्यासाठी विष्णू यांनी तळ्यात उडी घेतली. ही घटना घडत असताना दुसरा आठ वर्षांचा मुलगा काठावर होता. त्याने तातडीने घराकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले. त्यानंतर उपचारांसाठी खासगी दवाखान्यात हलवले.

मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. वावीचे सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे, पोलिस हवालदार प्रवीण अढांगळे यांनी घटनास्थळी भेट देत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. रात्री दोघांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या