Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

Video: देशदूत संवाद कट्टा: नागरी जीवनात अभियांत्रिकीची भूमिका महत्त्वाची

Share

नाशिक | प्रतिनिधी

तंत्रज्ञानाच्या विकासातून जीवनमान जास्त सुकर होत गेले आहे. मात्र त्यातील प्रत्येक सुविधांमध्ये अभियांत्रिकीचा वापर आहे. अवकाशापासून शेतीपर्यंत त्यांचा अंतर्भाव आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करताना मात्र सावधगिरी बाळगण्याची गरज असून, ती वापरताना त्या तंत्रज्ञानाबद्दल जागरुकताही असणे काळाची गरज असल्याचा सूर देशदूत संवाद कट्ट्यातून उमटला.

जागतिक अभियंता दिवसाच्या पूर्वसंध्येला देशदूत संवाद कट्टा उपक्रमात ‘अभियंता दिन व त्यांच्यापुढील आव्हाने’ यावर संवाद साधण्यात आला होता. यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे सेक्रेटरी सुमित खिंवसरा, नाशिक इन्फर्मेशन टॅक्नोलॉजी संघटनेचे पदाधिकारी ऋषिकेश वाकदकर, इन्होव्हेटर राजेंद्र पवार, स्टार्टअप केलेल्या उद्योजिका अपर्णा घाटे, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले हे होते.

यावेळी मान्यवरांनी मांडलेल्या विचारात प्रामुख्याने अभियांत्रिकीचा वापर हा मानवाच्या प्रत्येक पावलाशी आज जोडलेला आहे. कालानुरुप बदल होत गेले, तंत्रज्ञानान जास्त विकसित झाले, त्यांच्या शाखा वाढल्या व त्या माध्यमातून विविध क्षेत्रात सखोल अभ्यास होत गेला. अभियंते प्रश्नाचे उत्तरे शोधून ते काम सुकर करण्यासाठी मार्ग तयार करीत असतात. मात्र त्यासाठी गरज असते ती दिशा निश्चित करून त्यावर ‘फोकस’ करून काम करण्याची. प्रत्यक्षात मुलांना अभियंता बनवणे आपण त्यांच्यावर थोपू शकत नाही.

त्याची आवड असली तरच त्याला त्यात टाकणे योग्य असते. आपली आवड काय, परिसरात काय घडत आहे. याचा अभ्यास करणेही गरजेचे आहे. आपली आवड व लोकांची मागणी याची सांगड घालून सहज हाताळल्यास व लोकांना वापरासाठी सुलभ उत्पादन दिल्यास मानवी जीवन सुकर होत जाईल, असा सूर ‘देशदूत संवाद कट्टा’चर्चेतून उमटला.

तेव्हा पासून ते आजवरच्या सर्व प्रवासात एक जमात सतत कार्यरत राहिली. आधी कारागीरांच्या स्वरूपात तर आता अभियंत्याच्या स्वरूपात. नवनिर्माण, आधुनिकीकरण, संशोधन यासाठी सतत प्रयत्नशील असणारे हे लोक असतात. आपल्या प्रत्येकाच्या मनात शरीरात काही अंश तरी हा अभियंत्याचा गुण असतो. अन्यथा एकही नित्यकर्म आज करू शकलो नसतो. अभियंत्यांनी शोधलेल्या वस्तू वापरताना हा गुण दिसून येतोच आणी प्रत्येकाच्या घरात एकतरी अशी गोष्ट असणारच. म्हणूनच जिवनात अभियांत्रीक किंवा रूढ भाषेतील इंजिनियर एक अविभाज्य घटक आहे.

मुलांच्या बाबत जागरुकता गरजेची आहे. अज्ञानातून चुकीच्या क्षेत्राची निवड केल्यास वेळ वाया जातोच, त्यासोबतच आयुष्याला दिशाहीनही करतो. सुरुवातीला आपल्याला त्यात खरच आवड असली तरच अभियांत्रिकीला जावे. निर्माण होणार्‍या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आग्रही राहण्याची भावना असणे गरजेचे आहे. पुस्तकांच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे.
-अपर्णा घाटे

प्रश्न सोडवण्यासाठी सोपे तंत्रज्ञान वापरणे म्हणजे इंजिनिअरिंग होय. प्रश्नांसोबतच मुलांच्या कल्पकतेत खूप संधी निर्माण करता येऊ शकते. त्यासाठी विचारांना दिशा असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने स्वत:ची वाटचाल ठेवणेही गरजेचे आहे. आपली दिशा कशी विकसित करावी, यावर लक्ष देण्याची गरज आहे. आपली आवड व बाजारातील मागणी यावर लक्ष देण्याची गरज आहे.
-ऋषिकेश वाकदकर

समाजाला पडणार्‍या प्रश्नांची सोडवणूक कशी केली जाईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या बुद्धिचा विकास कसा साधता येईल, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. माहितीच्या माध्यमातून ज्ञान विकसित केले जाते. आपल्या ज्ञानाला भविष्याबाबतचा प्रश्न पडला पाहिजे तरच त्याची किंमत कळणार आहे.
-सुमित खिंवसरा

गरज ही शोधाची जननी आहे. त्यावर काम केल्यास खर्‍या अर्थाने संशोधन होत असते. दैनंदिन जीवनात भेडसावणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजेच इंजिनिअरिंग होय. आपली बुद्धी व तर्कशास्त्राच्या वापरासाठी सज्ज राहणे म्हणजेच अभियांत्रिकी होय. प्रत्येकाने सभोवताली घडणार्‍या गोष्टींचे आकलन केले तरी संशोधनाला खूप वाव मिळणार आहे.
-राजेंद्र पवार

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!