Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; वावी येथील घटना; वाहनातून उडी मारल्याने एक मुलगी गंभीर जखमी

Share

नाशिक । प्रतिनिधी

सिन्नर – शिर्डी महामार्गावरून वावीजवळील पिंपरवाडी येथे जाण्यासाठी निघालेल्या दोन शाळकरी मुलींचे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज दि.18 दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. महामार्गालगत असलेल्या घराजवळ मोठ्याने आवाज देऊनही न थांबलेल्या भरधाव वाहनातून घाबरून उडी मारल्याने एक मुलगी गंभीर जखमी झाली असून दुसर्‍या मुलीला मिरगाव फाट्याजवळ उतरवून देत सदर वाहनचालकाने पोबारा केला.

दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या माधुरी काळू ब्राम्हणे या मुलीवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. माधुरी व तिच्यासोबत असणारी कोमल बाळासाहेब ब्राम्हणे हि चुलत बहीण वावी येथील नूतन विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकतात. सध्या सत्र परीक्षा सुरु असून दुपारी अडीच वाजता पेपर संपल्यावर या दोघी शिर्डी महामार्गावरून पाथरेच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना घराकडे जाण्यासाठी हात देत होत्या. पिंपरवाडी शिवारात महामार्गालगतच त्याचे घर आहे.

यावेळी रस्त्याने जाणार्‍या एका पिकअप जीप चालकाने या दोघीना तुमच्या घराजवळ सोडतो असे सांगूनपाठीमागे बसायला सांगितले. मात्र सांगितलेल्या ठिकाणी न थांबता त्याने जीप भरधाव पिटाळली. हे पाहून दोघीनी आरडाओरड करायला सुरुवात केली. ते एकूण त्यांच्या घरातील माणसे रस्त्याकडे धावली. दुचाकीवरून पाठलाग केला. मात्र घाबरलेल्या माधुरीने जीव वाचवण्यासाठी गोपी इस्टेटच्या जवळ जीपमधून उडी मारली. यात तिच्या चेहर्‍याला व हातापायांना गंभीर जखमा झाल्या.

यानंतर सदर जीपचालकाने मिरगाव फाट्याजवळ कोमलला उतरवून देत पोबारा केला. तीला दुचाकीवरून पाठीमागे आलेल्या नातेवाईकांनी सुखरूप ताब्यात घेतले. तर जखमी झालेल्या माधुरीला उपचारासाठी तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

याप्रकरणी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत नोंद घेण्यात आली आहे. याबाबत वावी पोलीस ठाणे अथवा शाळेकडे चौकशी केली असता दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या प्रकाराबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती. रुग्णालयातून प्रथम माहिती अहवाल आल्यावर रात्री उशिरा वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी ब्राम्हणे कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेबद्दल माहिती घेतली व एका सहकार्‍याला नाशिकला रुग्णालयात रवाना केले. शाळेतील शिक्षकांनी देखील रात्री उशिरा घरी जाऊन या विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेतली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!