Friday, April 26, 2024
Homeनाशिकबंदीवानांची मधुमेह, मानसिक आरोग्य तपासणी

बंदीवानांची मधुमेह, मानसिक आरोग्य तपासणी

नाशिक । भारत पगारे

आजमितीस राज्यातील सर्व तुरुंग मिळून सुमारे 34 हजार बंदीवान असून अनेक तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान ठेवलेले आहेत. अनेक बंदीवानांना मानसिक आजार, कर्करोग, त्वचारोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह अनेक आजार जडतात. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्वच तुरुंगांमधील बंदीवानांंची तपासणी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय यंत्रणेने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील 3 हजारांहून आधिक बंदीवानांंची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे.

- Advertisement -

असांसर्गिक आजारांचे देशातील व राज्यातील वाढते प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य विभागाने महाराष्ट्रात मधुमेह व उच्च रक्तदाबाची व्यापक तपासणी मोहीम यापूर्वीच राबवली आहे. मात्र, तुरुंगातील बंदीवान हे सर्वंकष आरोग्य तपासणीतील दुर्लक्षित घटक असल्याचे लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य संचालनालयाने राज्यात असलेल्या तुरुंगांमधील सर्व कैद्यांची मधुमेह, रक्तदाब, मानसिक आरोग्य, तीन प्रकारचे कर्करोग (मुख, स्तन आणि सव्र्हायकल), तसेच डोळ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार आगामी 15 दिवस असांसर्गिक आजार तपासणी मोहिमेंतर्गत डॉक्टर व सेवकांंच्या माध्यमातून ही आरोग्य तपासणी राबविण्यात येणार आहे.

यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना आदेश देण्यात आले आहेत. राज्यात एकूण 54 तुरुंग असून यात 13 खुले तुरुंग आहेत. याशिवाय 93 दुय्यम कारागृहे आहेत. आठशेहून अधिक बंदीवान ठेवण्याची क्षमता असलेले नऊ तुरुंग, तर 300 ते 800 बंदीवान ठेवण्याची क्षमता असलेले 19 तुरुंग आहेत. आजघडीला राज्यातील सर्व तुरुंगात मिळून सुमारे 34 हजार बंदीवानअसून अनेक तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान ठेवलेले आहेत.

या तपासणीसाठी आरोग्य अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, कर्करोग तसेच मानसोपचार तज्ज्ञांसह आवश्यक कर्मचार्‍यांची पथके तयार करण्यात आली असून, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिपत्याखाली आगामी 15 दिवस ही तपासणी करण्यात येईल. या तपासणीत कॅन्सर अथवा अन्य आजारांचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहे. केंद्राच्या धोरणानुसार संपूर्ण राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून असांसर्गिक आजारांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात कोणताही घटक सुटू नये, याची काळजी घेण्यात येत आहे. आदिवासी जिल्हे, दुर्गम भाग, शालेय मुले तसेच तुरुंगातील बंदीवानांची या योजनेत तपासणी केली जात आहे, असे राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले आहे.

जिल्हा रुग्णालयाचा सहभाग

आरोग्य संचालनालयाकडून राबविल्या जाणार्‍या या मोहिमेत जिल्हा रुग्णालयाने तत्काळ सहभाग घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापलेल्या वैद्यकीय पथकाने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील 3 हजार बंदीवानांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. ज्या कैद्यांना पुढच्या तपासणीची आवश्यकता आहे, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जाणार आहे.

मध्यवर्ती कारागृहात आठवडाभर बंदीवानांची तपासणी केली गेली. 30 वर्षांवरील जे बंदीवानआहेत, त्यांची असंसर्गजन्य अर्थात बीपी, मधुमेह या रोगांची तपासणी करण्यात आली. यासह मानसिक आरोग्यासह त्वचारोगाचीही तपासणी करण्यात आली आहे. बंदीवानाच्या आरोग्य तपासणीचा अहवाल एक्सपर्ट कमिटीकडे पाठविला जाईल.

-डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय,नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या